पुणे : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गिकेवरील मेट्रो सेवा पुढील वर्षी मार्चपासून सुरु करण्याचे नियोजन आहे. या मार्गिकेचे काम सुमारे ९० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे हिंजवडीपासून बाणेरदरम्यान या मेट्रोची सेवा सुरू करून पुणेकरांना दिवाळी भेट द्यावी, अशी मागणी आयटी कर्मचाऱ्यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) केली आहे. त्यामुळे दिवाळीत या मार्गावर मेट्रो धावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

फोरम फॉर आयटी एम्प्लॉईजने ही मागणी केली आहे. आयटी फोरमने म्हटले आहे की, बाणेर परिसरात मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्या आहेत. या ठिकाणी एक ते दोन किलोमीटरच्या परिघात दीड ते दोन लाख आयटी कर्मचारी कार्यरत आहेत. बाणेर आणि बालेवाडी भागात मोठ्या प्रमाणात निवासी संकुले असून, मोठ्या संख्येने आयटी कर्मचारी या परिसरात वास्तव्यास आहेत. बाणेरमधून दररोज हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये आयटी कर्मचाऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या ठिकाणी रस्त्यांची स्थिती खराब असल्याने तासनतास वाहतूक कोंडी असते.

आयटी कर्मचाऱ्यांची प्रवासाची समस्या सोडविण्यासाठी टप्प्याटप्प्याने मेट्रो सेवा सुरू करावी. पहिल्या टप्प्यात हिंजवडी ते बाणेर या टप्प्यात मेट्रो सेवा सुरू करावी. यामुळे हिंजवडी ते बाणेर हा आयटी कर्मचाऱ्यांचा प्रवास अधिक सुकर होऊन या भागातील वाहतूक कोंडीही कमी होईल. वाहतूक कोंडीतून सुटका करण्याची मागणी आयटी कर्मचारी सातत्याने करीत आहेत. मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनीही या प्रकरणी कोंडी सोडविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे मेट्रो सेवा टप्प्याटप्प्याने सुरू केल्यास आयटी कर्मचाऱ्यांसह सर्वच नागरिकांना दिलासा मिळेल. हे आयटी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी अथवा नाताळची भेट ठरेल, असेही फोरमने स्पष्ट केले आहे.

बालेवाडीपर्यंत चाचणी पूर्ण

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाची पहिली चाचणी जुलैमध्ये यशस्वीपणे पार पडली होती. गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर पुणेरी मेट्रो प्रथमच हिंजवडीतून बाहेर पडली होती. त्यावेळी हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोची माण डेपोपासून ते बालेवाडी स्टेडियम येथील स्टेशन क्रमांक १० पर्यंत चाचणी यशस्वीपणे पार पडली होती. या मेट्रो मार्गाचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याची अंतिम मुदत ठरविण्यात आली आहे. सुरुवातीला जमीन भूसंपादनातील अडथळे आणि तांत्रिक कारणांमुळे काम पुढे ढकलले गेले होते. तब्बल २३.३ किमी लांबीच्या या मार्गामुळे दररोज वाढत जाणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

मेट्रोचे ९० टक्के काम पूर्ण

हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. माण डेपो ते पीएमआर-४ स्टेशन दरम्यान पहिली चाचणी जुलै महिन्यात यशस्वीरीत्या पार पडली आहे. या मार्गावर एकूण २३ स्थानके असणार असून शहरातून हिंजवडीला कामासाठी जाणाऱ्या नागरिकांचा मौल्यवान वेळ वाचणार आहे. हा मार्ग भारतातील पहिला सार्वजनिक-खाजगी भागीदारीत ( पीपीपी) उभारला जाणारा मेट्रो प्रकल्प आहे. टाटा व सिमेन्स या कंपन्यांच्या संयुक्त उपक्रमातून पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडच्या नावाने प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाचे काम २५ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरू झाले होते. आतापर्यंत प्रकल्पासाठी चार मेट्रो रेलगाड्या उपलब्ध झाल्या आहेत. प्रत्येक गाडीत सुमारे एक हजार प्रवासी प्रवास करू शकणार असून ८० किमी प्रतितास या वेगाने गाड्या धावणार आहेत.