पुणे : ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर धर्मवीर संभाजी महाराजांनी औरंगजेबाशी दिलेला लढा आणि पानिपतमध्ये सेनापती धारातीर्थी पडल्यानंतर सैन्याने दिलेला लढा हे मराठा साम्राज्याचे गौरवाचे पान आहे. तर, सत्तेसाठी पुतण्याची झालेली हत्या मराठा साम्राज्यासाठी लांछनास्पद आहे,’ असे मत इतिहासाचे अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी रविवारी व्यक्त केले. ‘नारायणराव पेशवे यांची हत्या हे नैतिकतेचे अधःपतन असून राघोबादादाच्या चारित्र्याला लागलेला कलंक आहे,’ असे त्यांनी सांगितले.

मुळा मुठा पब्लिशर्सच्या वतीने डाॅ. उदय कुलकर्णीलिखित मूळ इंग्रजी पुस्तकाच्या डाॅ. विजय बापये यांनी अनुवादित केलेल्या ‘राघोबा- नारायणराव पेशव्याचा खून’ या पुस्तकाचे प्रकाशन पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी बलकवडे बोलत होते. उत्तरार्धात गजानन परांजपे आणि अमित वझे यांनी पुस्तकातील काही भागाचे अभिवाचन केले.

बलकवडे म्हणाले, ‘पानिपतानंतर मराठा राज्य टिकेल की नाही, अशी स्थिती असताना माधवराव पेशवे यांनी समर्थपणे दहा वर्षे कारभार केला. त्यांच्या अकाली मृत्यूनंतरचा इतिहास सर्वश्रुत आहे. राघोबादादा एकाचवेळी नायक आणि खलनायक आहे. अटकेपर्यंत पराक्रम करणारी राघोभरारी सर्वांच्या गळ्यातील ताईत होती. सदाशिवराव पेशवे यांनी अर्थनीती पाहायची आणि राघोबादादांनी पराक्रम करायचा, असे नानासाहेब पेशवे यांचे धोरण होते. आपण दुय्यम आहोत ही भावना निर्माण झालेले राघोबादादा माधवराव यांच्या वतीने कारभार करताना ते स्वतःचे स्थान आणि भवितव्याची तरतूद करतात. त्यातूनच त्यांनी आपल्या स्वार्थासाठी शिंदे आणि होळकर यांच्या कुटुंबांमध्ये कलह लावले. माधवराव यांच्या अकाली निधनानंतर नारायणराव यांच्याशी राघोबादादा यांचे पटले नाही. म्हणून नारायणरावांचा खून करण्यापर्यंत त्यांची मजल गेली.’

डॉ. कुलकर्णी म्हणाले, ‘राघोबादादा आणि सदाशिवरावभाऊ हे मराठा साम्राज्याचे वैभव होते. अहमदाबाद आणि दिल्ली काबीज केलेले राघोबादादा हे बाजीराव पेशवे यांच्याप्रमाणे अपराजित सेनानी होते. पण, शीघ्रकोपी, हलक्या स्वभावाचे असेही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू दिसतात. माधवराव यांच्यामुळे पेशवेपद मिळणार नाही हे ध्यानात आल्यानंतर त्यांचा विवेक ढळताना दिसतो. माधवराव यांच्यानंतर नारायणराव यांच्याशी त्यांचे बिनसले. राघोबादादाची ईर्ष्या त्यांना आणि मराठा साम्राज्याला भोवली.

डॉ. विजय बापये म्हणाले, ‘कुलकर्णी यांचे हे पुस्तक वाचल्यानंतर राघोबादादा यांच्याविषयीची सहानुभूती गेली. त्यांनी आपला विनाश ओढवून घेतला. राज्यकर्त्यांनी घेतलेले निर्णय रद्द करणे किंवा उलटे करणे हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम होता.’ मोहन शेटे यांनी सूत्रसंचालन केले.