लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : कोरेगाव पार्क भागाील एबीसी फार्म रस्त्यावर मध्यरात्री भरधाव मोटारीने दोन दुचाकींना धडक दिली. मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. अपघातात दुसऱ्या दुचाकीवरील तीन तरुण किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी पहाटे मोटारचालक तरुणाला अटक केली.

रौफ अकबर शेख असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मोटारचालक आयुष प्रदीप तयाल (वय ३४, रा. हडपसर) याला अटक करण्यात आली. गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास कोरेगाव पार्क भागातील एबीसी फार्म रस्त्याने दुचाकीस्वार रौफ शेख मुंढव्याकडे निघाला होता. त्यावेळी भरधाव वेगाने निघालेल्या मोटारीने एका दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील तीन तरुण फेकले गेले. सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. त्यानंतर मोटारचालक आयुषने दुचाकीस्वार रौफला धडक दिली. अपघातात रौफ गंभीर जखमी झाला. अपघातानंतर मोटारचालक आयुष पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या रौफला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

आणखी वाचा-पिंपरी : पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय ‘येथे’ होणार; बुधवारी मागणी आणि गुरुवारी ताथवडेतील २० हेक्टरचा मिळाला भुखंड

अपघात करुन पसार झालेल्या मोटारीचा वाहन क्रमांक मिळाला. त्यानंतर पोलिसांनी मोटारचालक आयुषला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, शुक्रवारी सकाळी त्याला अटक करण्यात आली.

शहरात गंभीर अपघातांच्या घटनांमध्ये वाढ

कल्याणीनगरभागात १९ मे रोजी भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले होते. कर्वे रस्ता परिसरात भरधाव डंपरच्या धडकेत पादचारी तरुणी मृत्युमुखी पडल्याची घटना बुधवारी (९ ऑक्टोबर) सकाळी घडली. अपघातात आरती सुरेश मनवाने (वय २३, रा. एरंडे हॉस्टेल, भेलके नगर, कोथरूड) हिचा मृत्यू झाला. कर्वे रस्त्यावर यापूर्वी गेल्या काही महिन्यात गंभीर अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. बहुतांश अपघात भरधाव वेग आणि बेदरकारवृत्तीमुळे झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hit and run in koregaon park area bike rider dies in collision with speeding car pune print news rbk 25 mrj