पुणे : केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियान’ (नॅशनल ग्रीन हाय़ड्रोजन मिशन) अंतगर्त हायड्रोजन इंधनावरील बसची चाचणी बुधवारी पुण्यात घेण्यात आली. पुढील सात दिवस शहरातील विविध भागांमध्ये ही चाचणी घेण्यात येणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत या बसचा अवलंब करण्यात येणार आहे.

देशात दिल्ली आणि बडोद्यात हायड्रोजन इंधनावर बस धावत आहेत. पुण्यातही चाचणी घेण्यात आली. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा), पीएमपी, टाटा मोटर्स आणि इंडियन ऑईल यांच्या समन्वयातून बुधवारी औंध येथील रस्त्यावर बसची चाचणी घेण्यात आली. ‘महाऊर्जा’ प्रकल्प विभागाचे महाव्यवस्थापक आनंद रायदुर्ग, पीएमपीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे आदी उपस्थित होते.

‘राष्ट्रीय पातळीवर इंधनाच्या बदलत्या किमती, कार्बन उत्सर्जनामुळे वाढते प्रदूषण या कारणांमुळे सरकारकडून पर्यायी मार्गांचा अवलंब करण्यात येत आहे. त्यानुसार पुढील सात दिवस शहरातील वर्दळीचे रस्ते, महामार्ग यावर या बसची चाचणी घेण्यात येणार आहे. चाचणीदरम्यान, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय), केंद्रीय वाहतूक संस्था (सीआयआरटी), महाऊर्जा, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) अधिकारी, तसेच टाटा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत. चाचणीदरम्यान आढळून येणाऱ्या त्रुटी दूर करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे,’ असे ‘महाऊर्जा’ प्रकल्प विभागाचे महाव्यवस्थापक आनंद रायदुर्ग यांनी सांगितले.

बसची वैशिष्ट्ये

प्रवासी क्षमता – ३५ आसन, १० उभे

वेग क्षमता – ताशी ७० किलोमीटर

इंधन क्षमता – १ किलोमध्ये ११ किलोमीटर

एकूण वहन क्षमता – ७० किलोमध्ये २५० किलोमीटर

हायड्रोजन इंधन निर्मिती

‘हायड्रोजन इंधन नैसर्गिक वायू, पाणी किंवा बायोमासपासून तयार केले जाते. मिथेन आणि पाण्याची वाफ यांच्या तापमानानुसार प्रक्रिया केली जाते. त्यानुसार पाण्यातील (एचटूओ) विजेच्या साहाय्याने हायड्रोजन (एचटू) वेगळा करून विभक्तीकरण केले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने लिथियमचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून, हा पर्यावरणपूरक ऊर्जास्रोत आहे. चाचणीनुसार व्यवस्थापन आणि निकषांनुसार अंमलबजावणी करण्यात येईल,’असेही रायदुर्ग यांनी नमूद केले.

पीएमपीच्या ताफ्यात पर्यावरणपूरक हायड्रोजन इंधनावरील बसचा अवलंब करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यानुसार महाऊर्जा आणि टाटा मोटर्स कंपनीच्या माध्यमातून या बसच्या वापरासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. चाचणीनुसार बदल करून लवकरच हायड्रोजन इंधनावर आधारित बस पीएमपी सेवेत दाखल करण्यात येतील. पंकज देवरे, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी