पिंपरी : सीबीआय अधिकारी भासवून आणि बनावट आधारकार्डचा गैरवापर करत एका वकिलाला आर्थिक फसवणुकीच्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी दिली. या भीतीपोटी वकिलाने वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण एक कोटी ८० लाख ३७ हजार रुपये भरले. ही घटना पिंपरी येथे ऑनलाइन पद्धतीने घडली.
या प्रकरणी ७३ वर्षीय जेष्ठ वकिलाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला व त्यांच्या पत्नीला खोट्या गुन्ह्यामध्ये कारवाई करून अटक करण्याची तसेच कोणाला काही सांगितल्यास त्यांनाही अटक करण्याची भीती घातली. त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचे बनावट पीडीएफ पाठवून विश्वास संपादन केला. खात्यावरील रक्कम पडताळणी झाल्यानंतर परत करण्याचा विश्वास देऊन फिर्यादीकडून जबरदस्तीने एकूण एक कोटी ८० लाख ३७ हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर भरण्यास भाग पाडले. सायबर पोलीस तपास करत आहेत.
ऑनलाइन गुंतवणुकीत ३३ लाखांची फसवणूक
ॲप्लिकेशनद्वारे विश्वास संपादन करून गुंतवणुकीच्या नावाखाली ३३ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना पिंपरी येथे घडली.या प्रकरणी ६९ वर्षीय व्यक्तीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीचा ऑनलाइन पद्धतीने एका ॲप्लिकेशनद्वारे विश्वास संपादन केला. फिर्यादीकडून ३३ लाख २५ हजार रुपये ऑनलाईन गुंतवणूक म्हणून घेतले. मात्र, त्या रकमेवर कोणताही परतावा दिला नाही किंवा कोणताही प्रतिसाद दिला नाही. पिंपरी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
परताव्याचे आमिष दाखवून १६ लाखांची फसवणूक
समाजमाध्यमातील व्हॉट्सॲप समूहात समाविष्ट करून आणि परताव्याच्या आमिषाने एका संकेतस्थळावर गुंतवणूक करण्यास सांगून एकाची १६ लाख ३६ हजार ९६५ रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना पिंपळे सौदागर येथे घडली.
या प्रकरणी ४२ वर्षीय व्यक्तीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीला एका समूहात समाविष्ट करून त्यांना स्टॉक मार्केटींगची माहिती देऊन गुंतवणुकीवर खूप जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. आरोपींनी फिर्यादीला एका संकेतस्थळावर खाते उघडायला लावले. वेगवेगळ्या खात्यावर एकूण १६ लाख ३६ हजार ९६५ रुपये गुंतवण्यास भाग पाडले. ही रक्कम परत काढण्याचा प्रयत्न केला असता, आयपीओ मधील ३८ लाख १० हजार ८४६ रुपये रक्कम परत भरावी लागेल असे सांगून आणखी पैशांची मागणी केली व फिर्यादीची फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करत आहेत.
नोकरीच्या आमिषाने चार लाखांची फसवणूक
कंपनीत नोकरी देण्याचे आमिष दाखवून बँक खात्यावर ऑनलाइन चार लाख १० हजार ४१० रुपये घेऊन फसवणूक करण्यात आली. ही घटना पिंपरी येथे घडली.
या प्रकरणी ३४ वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला एका कंपनीमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवले. त्यांनी ऑनलाइन गुगल पे द्वारे त्यांच्या कंपनीच्या गुगल पे लिंकवर आणि कंपनीच्या बँक खात्यावर चार लाख १० हजार ४१० रुपये ऑनलाइन घेतले. नोकरीसाठीचे ऑफर लेटर न देता आणि भरलेली रक्कम परत न करता फिर्यादीची फसवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
६० हजार रुपये लंपास
बँक खात्यातून ६० हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केल्याची घटना आळंदीत घडली. या प्रकरणी २५ वर्षीय युवकाने आळंदी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या मोबाईलचा वापर करून अज्ञात आरोपीने त्यांच्या बँक खात्याचा ॲक्सेस मिळवला. त्यानंतर फिर्यादीच्या खात्यातून ६० हजार रुपये रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतली आणि त्यांची फसवणूक केली. आळंदी पोलीस तपास करत आहेत.
बैलांना मंदिर घेऊन गेल्याच्या रागातून पाच जणांना मारहाण
बैलांना मंदिरात का घेऊन गेले या रागातून एकाच कुटुंबातील १२ जणांनी पाच जणांना मारहाण केल्याची घटना चिंचवड येथे घडली.या प्रकरणी ५१ वर्षीय व्यक्तीने चिंचवड पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार १२ जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घरी असताना आरोपींनी त्यांच्या घरासमोर येऊन फिर्यादीच्या मुलाला ‘तू अगोदर बैल मंदिरात का घेऊन गेला’ या रागातून मारहाण केली. आरोपींनी फिर्यादी, त्यांचा मुलगा, पुतण्या आणि पुतणी यांना काठीने आणि ठोशाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. तसेच फिर्यादीची पत्नी आणि भावजय यांना शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. चिंचवड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.