पिंपरी : देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत काळोखे मळा आणि हगवणे मळा येथे एका व्यक्तीने शेतात लावलेली अफूची झाडे जप्त करण्यात आली. ही कारवाई पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी (२६ फेब्रुवारी) केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिलीप चंद्रकांत काळोखे (काळोखे वस्ती, देहूगाव) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस कर्मचारी किशोर परदेशी आणि जावेद बागसिराज यांना माहिती मिळाली कि, देहूगाव येथे काळोखे मळा आणि हगवणे मळा येथे एका व्यक्तीने त्याच्या शेतामध्ये अफूची झाडे लावली आहेत. त्यानुसार पोलिसांनी दिलीप काळोखे याच्या शेतात छापा मारून कारवाई केली.

शेतामध्ये कांद्याच्या पिकात अफू लावला होता. अफूच्या झाडांना फुले, बोंडे आली होती. पोलिसांनी तीन लाख २७ हजार रुपये किमतीची २१८ अफूची झाडे जप्त केली आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक निरीक्षक सचिन कदम, कर्मचारी किशोर परदेशी, जावेद बागसिराज, मयूर वाडकर, शिल्पा कांबळे, राजेंद्र बांबळे यांनी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dehugaon cultivation of opium 218 trees confiscated pune print news ggy 03 asj