पुणे : बांधकाम व्यावसायिक (बिल्डर) सदनिकाधारकांना नियमानुसार नागरी सुविधा देत नसल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे अशा गृहप्रकल्पांच्या बांधकामांची स्थळ पाहणी करून त्या तथ्य आढळल्यास ही बांधकामे थांबवण्याचे निर्देश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर डॉ. योगेश म्हसे यांनी बुधवारी दिले. वाघोली आणि माण भागातील काही सदनिकाधारकांनी केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने आयुक्तांनी बुधवारी संबंधितांची संयुक्त बैठक घेत तक्रारी निकाली काढण्याचे निर्देश दिले.
विकासक आपल्या ग्रहप्रकल्पांना मान्यता घेण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणेकडे आम्ही नागरिकांना अपेक्षित असलेल्या रस्त्यांसह इतर नागरी सुविधांची उभारणी करणार असल्याचे नमूद करतात. काही विकसक याकडे कानाडोळा करत असल्यामुळे संबंधित नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्या अनुषंगाने वाघोली परिसरातील गट क्रमांक ११८५ अ आणि ब तसेच माण भागातील रहिवासी प्रकल्पात राहणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी पीएमआरडीएकडे आल्या होत्या. त्यानुसार आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी तक्रारदार नागरिक आणि विकासकांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेत अटीशर्तींनुसार गृहप्रकल्पातील नागरिकांना सुविधा देण्याचे निर्देश दिले.
पीएमआरडीएकडे प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित गृहप्रकल्पांची विकास व परवानगी विभागाच्या माध्यामातून तातडीने स्थळ पाहणी करण्यात येणार आहे. याबाबत संबंधित विकसकांकडून आलेल्या अहवालाची पडताळणी करत त्यांनी दर्शवलेल्या सुविधा सदनिकाधारकांना मिळतात का नाही याची खात्री करण्यात येणार आहे. विकासकाने नागरी सुविधा न देता त्याच्या प्रकल्पास रहिवास वापरासाठी परवानगी देण्यात आली असेल तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. यासह प्रकल्पांना मान्यता देताना अधिकाऱ्यांनीही स्थळ पाहणी करूनच पुढील निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गुन्हे नोंदविणार
नागरिकांच्या तक्रारी असलेल्या प्रकल्पांच्या अनुषंगाने पीएमआरडीएच्या विकास व परवानगी विभागाच्या माध्यमातून स्थळ पाहणी करण्यात येणार आहे. यानंतर संबंधित विकासकांनी सदनिकाधारकांना दिलेल्या नागरी सुविधांच्या आश्वासनाची पूर्ततेसाठी अवधी देण्यात येईल. यानंतर नागरी सुविधांची उभारणी न झाल्यास संबंधित बांधकामे थांबविण्यात येणार असून नियमानुसार त्या विकासकांवर गुन्हे नोंदविण्याचे आदेश आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी यांनी दिले. यावेळी विकास परवानगी व नियोजन विभागाचे संचालक अविनाश पाटील यांच्यासह वाघोली, माण भागातील विकासक आणि सदनिकाधारक उपस्थित होते.