पिंपरी- चिंचवड: हॉर्न वाजवल्यामुळे एकाने चालकाला पिस्तुलाचा धाक दाखवत बेदम मारहाण केल्याची घटना चिखलीमध्ये घडली आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेप्रकरणी अनिकेत चौधरी यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पैकी एकाला चिखली पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सविस्तर माहिती अशी की, अनिकेत चौधरी त्यांच्या मित्रासह त्रिवेणी नगर चौक तळवडे रस्त्यावरून राहत्या घरी जात होते. रस्त्यावरून जात असताना भरधाव चारचाकी गाडीला समोरील व्यक्ती हॉर्न वाजवूनही पुढे जाऊ देत नव्हता. दोन- तीन वेळेस हॉर्न वाजवल्यानंतर आरोपींनी तक्रारदार अनिकेत चौधरींच्या वाहनासमोर आडवी गाडी लावली. आरोपींनी खाली उतरून तक्रारदार अनिकेत चौधरी धक्काबुक्की केली. जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्याला पिस्तूल लावलं. हाताने बेदम मारहाण केली. पिस्तुलाच्या मुठीने अनिकेत चौधरी यांना डोक्यात मारून गंभीर जखमी केलं.

तसेच आरोपी यांनी फिर्यादी यांच्याकडील परवानाधारक पिस्तूल हिसकावून घेतले. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात अनिकेत चौधरी यांनी तीन जणांविरोधात तक्रार दिली आहे. पैकी एकाला चिखली पोलिसांनी अटक केली आहे. इतर दोघांचा शोध पोलीस घेत आहेत. ही घटना मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली आहे.