पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधून गेल्या १० वर्षांपासून कंपन्या बाहेर पडत आहेत. या माहिती-तंत्रज्ञान (आयटी) पार्कमधील पायाभूत सुविधांची स्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. याचबरोबर वाहतूककोंडी प्रचंड प्रमाणात वाढल्याने कंपन्या आयटी पार्कमधून बाहेर पडून दुसरीकडे स्थलांतरित होत आहेत. यामुळे रोजगारालाही मोठा फटका बसत आहे. हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनने गेल्या १० वर्षांत ३७ कंपन्या बाहेर गेल्याचा दावा केला आहे. मात्र, नेमक्या किती कंपन्या स्थलांतरित झाल्या याची आकडेवारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे नाही.

हिंजवडी आयटी पार्क २५ वर्षांपूर्वी सुरू झाला. आता येथे रस्ते, पाणी, कचरा आणि वीज या पायाभूत सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. आयटी पार्कमध्ये १३९ कंपन्या कार्यरत आहेत. आयटी पार्कचा मागील काही काळात विस्तार झाला. मात्र, त्या तुलनेत पायाभूत सुविधा वाढल्या नाहीत. आता पायाभूत सुविधांची स्थिती दयनीय आहे. आयटी पार्कमधील रस्ते अरुंद असून, त्यांची स्थिती अतिशय खराब आहे. यामुळे येथे वाहतूककोंडी नित्याचीच बाब झाली आहे. या सर्व प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेक कंपन्या आयटी पार्कमधून राज्यात इतरत्र अथवा परराज्यांत स्थलांतरित होत आहेत.

हेही वाचा : ‘ससून’मध्ये दिवसाला २४ रुग्णांचा मृत्यू कसा? नवीन अधिष्ठात्यांनी पदभार स्वीकारताच घेतला मोठा निर्णय

याबाबत हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनचे सचिव लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) योगेश जोशी म्हणाले, की गेल्या १० वर्षांपासून आम्ही सर्व यंत्रणांकडे पायाभूत सुविधांची स्थिती सुधारण्याची मागणी करीत आहोत. मात्र, त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही. गेल्या १० वर्षांत आमच्या सदस्य असलेल्या ३७ कंपन्या आयटी पार्कमधून बाहेर गेल्या आहेत. रस्ते खराब असून पावसाळ्यात त्यांची स्थिती दयनीय होते. त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. रस्त्यांना पदपथ नसून, पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. शासकीय यंत्रणांकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही.

कोंडीमुळे आर्थिक भुर्दंड

हिंजवडी आयटी पार्कमध्ये वाहतूक कोंडीमुळे अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी दीड तास लागतो. वाहतूक कोंडीत दररोज कर्मचारी एक तास वाया घालवतात. आयटी कंपनीकडून सेवा देताना कर्मचाऱ्याचे तासाचे सुमारे २५ डॉलर आकारले जातात. एक तास वाया गेल्याने प्रत्येक कर्मचाऱ्यामागे २५ डॉलरचे नुकसान दररोज होत आहे, असा दावाही योगेश जोशी यांनी केला.

हेही वाचा : ससूनचे नवीन अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के पदभार स्वीकारताच म्हणाले…

आमच्या संघटनेच्या सदस्य असलेल्या ३७ कंपन्या गेल्या दहा वर्षांत हिंजवडी आयटी पार्कमधून बाहेर गेल्या आहेत. सदस्य नसलेल्या इतर कंपन्याही या काळात बाहेर गेल्या असून, तीही संख्या मोठी आहे. त्यामुळे आयटी पार्कमधील पायाभूत सुविधांची समस्या तातडीने सोडविण्याची आवश्यकता आहे.

लेफ्टनंट कर्नल (नि.) योगेश जोशी, सचिव, हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन

हिंजवडी आयटी पार्कमधील पायाभूत सुविधांचा विषय विविध शासकीय यंत्रणांशी निगडित आहे. त्यामुळे या प्रकरणी लवकरच सर्व यंत्रणांची उच्चस्तरीय बैठक घेतली जाणार आहे. आयटी पार्कमधील समस्या सोडविण्यासाठी पावले उचलली जात आहेत.

अर्चना पठारे, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

राजीव गांधी इन्फोटेक पार्क

कंपन्या – १३९
मनुष्यबळ – २ लाख १७ हजार ४१२