शिरूर : पुण्यातील कल्याणीनगर अपघाताचे प्रकरण चर्चेत असतानाच शिरुरमध्येही मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी ढाब्यावर चाललेल्या तरुणांच्या मोटारीने दुचाकीला धडक दिल्याने मजुराचा मृत्यू झाला, तर सहप्रवासाी जखमी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कवठे येमाई येथील इचकेवाडीनजीक गुरुवारी ही घटना घडली. अपघातानंतर संबंधित तरुण पसार झाले असून, त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

कवठे येमाईतील इचकेवाडी येथील बसस्थानकानजीक पारगाव ते कवठे येमाई मार्गावर दीपक येठेकर दुचाकीवरून जेवणाचा डबा आणण्यासाठी जात होते. रंगनाथ बन्सी आढाव हे त्यांच्यासह दुचाकीवर होते. मात्र, कवठे येमाई बाजूकडून पारगाव बाजूकडे उलट दिशेने भरधाव येणाऱ्या इको मोटारीने दुचाकीला धडक दिली. त्यात दीपक यांचा मृत्यू झाला. तर मागे बसलेले रंगनाथ गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शिरूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत दीपक यांच्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा : कृष्णा खोऱ्यातील ९०० धरणे सुरक्षित, जलसंपदा विभागाकडून धरणांची तपासणी

अपघातानंतर वाढदिवसाची पार्टी?

अपघात केल्यानंतर संबंधित तरुणांनी ढाब्यावर जाऊन पार्टी केल्याची चर्चा शिरुर परिसरात आहे. तरुण पसार झाले असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. त्यांना अटक करण्यात आल्यानंतरच त्यांनी मद्यप्राशन केले होते, का स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.