पुणे : छत्रपती संभाजी महाराज पोलिस चौकीमागे असलेल्या नदीपात्रातील रस्त्यावर उभारण्यात आलेले बेकायदा होर्डिंग उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने पाडून टाकले होते. आता पुन्हा त्या ठिकाणी होर्डिंग उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत चौकशी करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दादागिरी करून हुसकावून लावण्यात आले. दरम्यान, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांनी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्य सरकारच्या आकाशचिन्ह नियमावलीनुसार सरकारी जागेत, नदीपात्रात कोणत्याही प्रकारची होर्डिंग उभारण्यास बंदी घालण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन करून काही वर्षांपूर्वी महापालिकेच्या कसबा- विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत नदीपात्रातील रस्त्यावर बेकायदा होर्डिंग उभारले होते. त्यावेळी दोन कर्मचाऱ्यांना निलंबितही करण्यात आले होते. या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्या वेळी महापालिकेच्या बाजूने निकाल लागला होता. महापालिकेने हे बेकायदा होर्डिंग दोन वर्षापूर्वी फेब्रुवारी २०२३ मध्ये पाडून टाकले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता पुन्हा याच ठिकाणी नव्याने होर्डिंग उभारणी केली जात आहे. त्याचे कामदेखील सुरू असून, आवश्यक साहित्य संबंधित होर्डिंग व्यावसायिकाने नदीपात्रात आणून ठेवले आहे. याची चौकशी करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना संबधित व्यावसायिकाने न्यायालयाने होर्डिंग उभारण्याची परवानगी दिल्याचे उत्तर दिले. मात्र, न्यायालयाचा आदेश दाखविण्यास नकार दिला. यावर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी इतर प्रश्न उपस्थित केले असता त्या ठिकाणावरून या व्यावसायिकाने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करून धुसकावून लावले. याचा व्हिडीओ महापालिकेत सर्वत्र फिरत होता. याबाबत कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सुहास यादव म्हणाले, ‘या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल आहे. त्याची आवश्यक ती कागदपत्रे मागविण्यात आली आहेत.’

महापालिकेच्या विधी सल्लागार निशा चव्हाण म्हणाल्या, ‘या ठिकाणी होर्डिंग उभारण्याबाबत न्यायालयाने परवानगी दिली असल्याची कोणतीही माहिती महापालिकेला नाही.’ महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज म्हणाले, नदीपात्रात होर्डिंग उभारण्याची परवानगी महापालिकेकडून देण्यात आलेली नाही. बेकायदा पद्धतीने होर्डिंग उभारले जात असेल, तर पोलिसात तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune attempt to install hoarding in the riverbed behind chhatrapati sambhaji maharaj police station pune print news ccm 82 css