पुणे : खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले आहे. गेल्या बारा तासांमध्ये धरणांमध्ये पुणे शहराला १५ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून ११ हजार ४०७ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे पुन्हा मुठा नदीकाठच्या नागरिकांना जलसंपदा विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडून अजित पवारांवर कुरघोडी? पुणे जिल्ह्यातील महसूल कार्यालयांच्या अचानक तपासणीचा आदेश

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणात मिळून बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत ८८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत टेमघर धरणाच्या परिसरात ९५ मिलिमीटर, वरसगाव धरणक्षेत्रात ६६ मि.मी., पानशेत धरण परिसरात ६९ मि.मी. आणि खडकवासला धरणक्षेत्रात ११ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. सध्या धरणांमध्ये २५.७८ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ८८.४४ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. वरसगाव धरणातून वीजनिर्मितीसाठी ६०० क्युसेक, पानशेत धरणातून वीजनिर्मितीसाठी ६०० क्युसेक, तर खडकवासला धरणात १९४२ क्युसेकने आणि खडकवासला धरणातून मुठा नदीत ११ हजार ४०७ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. धरणांच्या परिसरात असाच पाऊस कायम राहिल्यास पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune continuous rain increase in water release from the khadakwasla dam pune print news psg 17 css