पुणे : शहरातील ताडीवाला रोड येथील एका झोपडपट्टीतील अरुंद गल्लीमध्ये आठ महिन्यांची गरोदर गाय आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अडकल्याची घटना घडली. तब्बल दहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर गायीची अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी सुखरूप सुटका केली.

अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताडीवाला रोड येथील एका झोपडपट्टीतील अरुंद गल्लीमध्ये गाय अडकली असल्याचा कॉल पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास नियंत्रण कक्षाला आला. त्यानंतर अग्निशामक दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या आणि त्याचवेळी वाईल्ड लाईफ रेस्क्यु टिम देखील दाखल झाली.

ती गल्ली खूप अरुंद असल्याने तेथील काही लोखंडी जिने, सिमेंटचे कट्टे काढण्यात आल्यानंतर तब्बल दहा तासाच्या अथक प्रयत्नांनंतर गायीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. तर गायीला काही ठिकाणी जखमा झाल्या असून तिच्यावर उपचार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

अग्निशमन दलाचे सहायक अधिकारी विजय भिलारे आणि जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी गायीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दोरीचा वापर करून गाईला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, गर्भवती असलेल्या गायीला बाहेर काढण्यात अडचण निर्माण झाली.