पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील वसतिगृहातून चोरट्यांनी एका विद्यार्थ्याचा ५० हजार रुपयांचा लॅपटाॅप चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका विद्यार्थ्याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठाच्या आवारातील जी-३ वसतिगृहातील एका खाेलीत विद्यार्थी राहायला आहे. २३ सप्टेंबर रोजी वसतिगृहातील खोलीचा दरवजा उघडा होता. दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्याने आत प्रवेश केला. खोलीत कोणी नव्हते. चोरट्याने तरुणाचा ५० हजार रुपयांचा लॅपटाॅप लांबविला. लॅपटाॅप चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. यापूर्वी विद्यापीठाच्या आवारातील वसतिगृहातून विद्यार्थ्यांचे लॅपटाॅप, मोबाइल संच चोरीला जाण्याच्या घटना घडल्या आहेत. पोलीस उपनिरीक्षक अंकुश गडांकुश तपास करत आहेत.

बाणेरमध्ये घरफोडी

बाणेरमधील एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील दीड लाख रुपयांचे साेन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका तरुणाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण बाणेरमधील साई रेसीडन्सी सोसायटीत राहायला आहे. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून दीड लाखांचे दागिने लांबविल्याचे बुधवारी (२४ सप्टेंबर) दुपारी उघडकीस आले. सहायक पोलीस निरीक्षक महेश थिटे तपास करत आहेत.