पुणे : लोहगाव परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला विमानतळ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून तीन लाख रुपयांचा १२ किलो गांजा जप्त करण्यात आला. अखिलेश गरीब मंडल (वय ३४, रा. लोहगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोहगावमधील कर्मभूमीनगर परिसरात एकजण थांबला असून त्याच्याकडे गांजा असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांना मिळाली. त्यानंतर तपात पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडील कापडी पिशवीत सुमारे १२ किलो गांजा सापडला, जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत तीन लाख रुपये आहे. मंडल हा बांधकाम मजूर आहे. त्याने गांजा कोठून आणला, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, गुन्हे शाखेच्या निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलीस कर्मचारी रुपेश पिसाळ, शैलेश नाईक, राकेश चांदेकर, अंकुश जोगदंडे, दादासाहेब बर्डे आणि पथकाने ही कारवाई केली. दोन दिवसांपूर्वी येरवडा भागात गांजा विक्री प्रकरणात एका तरुणाला अटक करण्यात आली होती. शहरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. अमली पदार्थ विक्री प्रकरणात अटक करण्यात आलेले विक्रेत्यांची चौकशी करुन अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.