पुणे : गेल्या वित्तीय वर्षामध्ये ससून रुग्णालयाला मिळालेल्या अनुदानातून सहा कोटी २७ हजार रुपये औषधे खरेदी करण्यासाठी हाफकिन संस्थेला देण्यात आले. मात्र, हाफकिन संस्थेकडून कोणत्याही प्रकारची औषधे ससूनला मिळालेली नाहीत, अशी धक्कादायक माहिती ससून रुग्णालय प्रशासनाने विभागीय आयुक्तालयाला पाठविण्यात आलेल्या अहवालात दिली आहे. ससूनमध्ये परिचारिकांची १०४ पदे आणि वर्ग चार संवर्गाची ३८१ पदे, तर बी. जी. वैद्यकीय महाविद्यालयात वर्ग चार संवर्गाची ९७ पदे रिक्त आहेत. याशिवाय ससूनमध्ये १२९६ खाटा मंजूर असताना १८०० पर्यंत खाटा वाढविण्यात आल्या असून, वाढीव खाटांसाठी आवश्यक मनुष्यबळाचा प्रस्ताव यापूर्वीच शासनाला पाठविण्यात आला आहे, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ससून सर्वोपचार रुग्णालयाला शुक्रवारी भेट देऊन तेथील आरोग्य सेवा, मनुष्यबळ, औषधपुरवठा आदींच्या अनुषंगाने पाहणी केली. याबाबत ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी एक अहवाल तयार करून विभागीय आयुक्त राव यांच्याकडे शनिवारी पाठविला. राव यांनी हा अहवाल तातडीने राज्य शासनाला सुपूर्त केला. ससूनमध्ये सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी शासनाकडून १२ कोटी २५ लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले. त्यांपैकी आठ कोटी ५७ लाख ५० हजार रुपये प्राप्त झाले.

हेही वाचा : VIDEO: गोष्ट पुण्याची भाग – ‘गदिमां’च्या सुरेल आठवणी जपणारं त्यांचं निवासस्थान पंचवटी!

या निधीपैकी सहा कोटी २७ हजार रुपये ससूनकडून हाफकिन संस्थेला वर्ग करण्यात आले, तर उर्वरित दोन कोटी ५७ लाख २३ हजार रुपयांची संस्था स्तरावर औषधे खरेदी करण्यात आली. मात्र, सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात हाफकिन संस्थेला ससूनकडून औषधे खरेदीसाठी देण्यात आलेल्या रकमेपैकी कोणतीही औषधे प्राप्त झालेली नाहीत. चालू आर्थिक वर्षासाठी १२ कोटी २५ लाख रुपये ससूनला मंजूर झाले. त्यांपैकी तीन कोटी ६७ लाख ५० हजार रुपये प्राप्त झाले. त्यांपैकी ४९ लाख ५५ हजार रुपयांची औषधे खरेदी ससून स्तरावर करण्यात आली. ससूनमध्ये परिचारिकांची ११०१ पदे मंजूर असून त्यांपैकी ९९७ पदे भरली आहेत, तर १०४ पदे रिक्त आहेत, असे अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा : बालेकिल्ल्यात अजित पवारांना धक्का; जेष्ठ नेते आझमभाई पानसरे यांचे शरद पवारांना समर्थन

ससून रुग्णालयात वर्ग चारची ८३४ पदे मंजूर असून त्यापैकी ४५३ पदे भरली आहेत, तर ३८१ पदे रिक्त आहेत. बै. जी. वैद्यकीय महाविद्यालयात वर्ग चारची १७१ पदे मंजूर असून त्यापैकी ७४ पदे भरली आहेत, तर ९७ पदे रिक्त आहेत. ससूनमध्ये साफसफाईसाठी खासगी संस्थेकडून १८० वर्ग चारची पदे भरली आहेत. ससूनमध्ये १२९६ खाटा मंजूर आहेत. मात्र, उपचारांची निकड पाहता १८०० खाटांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मंजूर पदे १२९६ खाटांसाठी असून वाढीव खाटांसाठी आवश्यक मनुष्यबळाचा प्रस्ताव यापूर्वीच शासनाकडे सादर करण्यात आला आहे, असेही अहवालात नमूद केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune no medicine supply to sassoon hospital from haffkine after payment of rupees 6 crores sassoon report pune print news psg 17 css