पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) देण्यात येणाऱ्या अनेक सेवा ऑनलाइन आहेत. असे असतानाही नागरिकांना या सेवा ऑनलाइन मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. अशा नागरिकांची लूट आरटीओतील मध्यस्थ (एजंट) राजरोस करीत असल्याचा आरोप होत आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय मध्यस्थांनी ताब्यात घेतल्याचे चित्र आहे. त्यांच्यासाठी सर्व अधिकाऱ्यांचे दरवाजे सताड खुले असून, या सर्व प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष सुरू आहे, अशी नागरिकांची तक्रार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरटीओमध्ये प्रवेश करताच नागरिकांना मध्यस्थांकडून कामाबद्दल विचारणा करतात. अनेक मध्यस्थ दिवसभर सावज शोधण्यात गुंतलेले असतात. मध्यस्थ नागरिकांना त्यांच्या कामांबद्दल अवाजवी रक्कम सांगतात. याचबरोबर एखाद्या नागरिकाने थेट अर्ज केल्यास त्याचे काम होणार नाही, असा धोक्याचा इशाराही ते देतात. आरटीओच्या आवारात असे शेकडो मध्यस्थ दिवसभर हिंडत असतात. मात्र, अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. अधिकाऱ्यांच्या दालनात अनेक मध्यस्थ थेट घुसतात. त्यांना कोणताही मज्जाव नसल्याचे चित्र आरटीओमध्ये आहे.

हेही वाचा : मावळ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सव्वा महिन्यात सव्वाकोटीची रोकड जप्त

आरटीओच्या अनेक सेवा ऑनलाइन मिळत असल्या, तरी काही त्रुटी काढून नागरिकांना त्यासाठी कार्यालयात बोलाविले जाते. याचा फायदा मध्यस्थांना होतो. आरटीओतील कामकाज प्रक्रिया माहिती नसलेल्या नागरिकांना तातडीने काम करून देण्याची हमी ते देतात. त्या बदल्यात ते पैशाची मागणी करतात. नागरिक वेळ वाचविण्यासाठी या दलालांना पैसे देतात. अशाप्रकारे नागरिकांची लूट सुरू आहे. सामान्य नागरिकांना रांगेत काही तास थांबावे लागत असताना मध्यस्थांना अधिकाऱ्यांच्या दालनात थेट प्रवेश कसा मिळतो, असा प्रश्न आरटीओमध्ये कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी उपस्थित केला. याच वेळी आरटीओ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धमकावण्यापर्यंत अनेक मध्यस्थांची मजल जाते. यामागे अर्थपूर्ण व्यवहार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : पुणे: गर्दी वाढताच फुकटे प्रवासी मोकाट! रेल्वेकडून कारवाईचा दंडुका अन् दररोज दहा लाखांचा दंड

वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना देण्याच्या विभागात अर्जदाराशिवाय इतर कोणालाही प्रवेश देऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत. यासाठी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती तिथे केली आहे. याचबरोबर एका अधिकाऱ्याला वारंवार संबंधित विभागात जाऊन तपासणी करण्यास सांगितले आहे.

संजीव भोर, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी

ड्रायव्हिंग स्कूलच्या शिक्क्याचे गौडबंगाल

शहरातील ड्रायव्हिंग स्कूलची संख्या मोठी आहे. या स्कूलमधील विद्यार्थ्यांना दलालांकडे पाठविले जाते. त्या वेळी त्यांच्या अर्जावर ड्रायव्हिंग स्कूलचा शिक्का मारलेला असतो. हा शिक्का पाहून आरटीओतील काम चुटकीसरशी होते. कारण अधिकारी हा शिक्का पाहून काहीही विचारणा न करता कार्यवाही करतात. त्यामुळे ड्रायव्हिंग स्कूलच्या शिक्क्यांचे नेमके काय गौडबंगाल आहे, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune rto office loot of citizens by rto agents who have direct connections with the rto officers pune print news stj 05 css