पुणे : पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हडपसर भागातील भेकराईनगर परिसरात घडली. याप्रकरणी पतीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तेजश्री आकाश उदमले (वय २२ रा. शिक्षक काॅलनी, भेकराईनगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी आकाश अशोक उदमले (वय २५) याच्याविरूद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तेजश्रीची आजी देऊबाई पांडुरंग नेटके (वय ६५, रा. कोरेगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

हेही वाचा : केरळी वाद्य ‘चेंदा मेलम’च्या वादनाने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अभिवादन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश आणि तेजश्री यांचा मार्च २०१९ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर आकाशने एका तरुणीचे अनैतिक संबंध असल्याची माहिती तेजश्रीला मिळाली. तिने याबाबत त्याच्याकडे विचारणा केली. आकाशने तिला मारहाण केली. ‘तुला मुलं होणार नाही, तू वांझोटी आहे’, असे म्हणून आकाशने तिचा छळ सुरु केला. तो घरखर्चाला पैसे देत नव्हता. त्याचा त्रास असह्य झाल्याने तेजश्रीने ७ सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार तपास करत आहेत.