पुणे : परदेशी चलन खरेदी व्यवहारात चोरट्यांनी तरुणाची एक लाख ४१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, विष्णू एक्सचेंजर डाॅट काॅम, राहुल, तसेच एका बँकेतील खातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार तरुणाने ऑनलाइन परदेशी चलन खरेदीबाबतची माहिती संकेतस्थळावरुन घेतली होती. त्यानंतर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्याानंतर आरोपींनी १७०० अमेरिकन डाॅलर एक लाख ४१ हजार ९०० रुपयांमध्ये देतो, असे सांगितले. तरुणाला एका बँक खात्यात एक लाख ४१ हजार ९०० रुपये जमा करण्यास सांगितले. तरुणाने पैसे जमा केल्यानंतर त्याला डाॅलर दिले नाहीत.

हेही वाचा : आमदार महेश लांडगेंना जीवे मारण्याची धमकी; धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

त्यानंतर तरुणाने आरोपींच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा आरोपींनी त्याला प्रतिसाद दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. फसवणूक, तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.