पुणे : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने टेम्पो रस्त्यात अडवून टोळक्याने चालकाला मारहाण करून टेम्पोची काच फोडल्याची घटना वारजे भागात घडली. टेम्पोमालकाने याबाबत विचारणा केल्यानंतर टोळक्याने त्याच्यासह मुलगा आणि भाच्याला मारहाण केली. तसेच कोयते उगारून दहशत माजविली. याप्रकरणी पोलिसांनी सराइतांना अटक केली.

याप्रकरणी आशितोष साठे, इस्तखार अन्सारी यांना अटक करण्यात आली. आरोपींबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रफिक मोहम्मद मणियार (वय ५४, रा. वारजे माळवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. साठे आणि अन्सारी हे सराईत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, मणियार यांचे वारजे माळवाडीतील तपोधाम भागात भंगार माल खरेदीचे दुकान आहे. शनिवारी सायंकाळी दुकानातील कामगार गोविंदकुमार हा दुकानातून टेम्पो घेऊन घरी निघाला होता. त्या वेळी आरोपींनी टेम्पो रस्त्यात अडविला. त्यांनी गोविंदकुमारकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. त्याने पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा आरोपींनी टेम्पोची काच फोडली. त्याला शिवीगाळ करून मारहाण केली. त्याच्या खिशातील दोनशे रुपये काढून घेतले. या घटनेची माहिती त्याने मणियार यांना दिली.

मणियार, त्यांचा मुलगा आणि भाचा तेथे आले. टेम्पोची काच का फोडली, अशी विचारणा त्यांनी आरोपींकडे केली. तेव्हा आरोपींनी मणियार यांच्या मुलाला बीअरच्या बाटलीने मारहाण केली. भाच्याच्या हातावर कठीण वस्तू मारून जखमी केले. आरोपींनी मणियार यांना पकडून त्यांच्या खिशातील पाचशे रुपये आणि मोबाइल संच काढून घेतला. त्यांच्या मुलाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. आरोपींनी ‘या भागात व्यवसाय करायचा असेल, हप्ता द्यावा लागेल’, अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने काेयते उगारून दहशत माजविली. पसार झालेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक जगदाळे तपास करत आहेत.