दत्ता जाधव

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : यंदा देशातून होणाऱ्या केळी निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. यंदाच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षांत फेब्रुवारीअखेपर्यंत देशातून १,०३५ कोटी रुपयांची एकूण ३ लाख ३३ हजार २६५ टन केळींची निर्यात झाली आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये ७४०.३४ कोटी रुपयांची सुमारे २ लाख ३२ हजार ५१८ टन केळी निर्यात झाली होती. यंदा फेब्रुवारीअखेरच मागील वर्षांपेक्षा ३०० कोटी रुपयांची निर्यात वाढली आहे. यंदा आजवरची उच्चांकी निर्यात होणार आहे.

महाराष्ट्रासह केरळ, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, ओडिशा, कर्नाटक आणि बिहार आदी प्रमुख राज्यांतून केळीची निर्यात होते. निर्यातीत राज्याचा वाटा सुमारे सत्तर टक्के आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१मध्ये राज्यातून सुमारे ५५६.६१ कोटी रुपयांची १ लाख ६३ हजार ६९५ टन केळीची निर्यात झाली होती. यंदा २०२१-२२ या आर्थिक वर्षांत फेब्रुवारीअखेर राज्यातून ८०५.६१ कोटी रुपये किमतीची सुमारे २ लाख ४१ हजार ५०९ टन केळी निर्यात झाली आहेत.  ‘अपेडा’ने दिलेल्या माहितीनुसार जगातिक केळी उत्पादनात देशाचा वाटा जवळपास २५ टक्के आहे. देशातून होणाऱ्या केळीच्या निर्यातीत सातत्याने वाढ होत आहे. २०१८-१९मध्ये ४१३ कोटी रुपयांच्या १.३४ लाख टनांची, तर २०१९-२०मध्ये ६६० कोटी रुपयांच्या १.९५ लाख टन केळींची निर्यात झाली होती. राज्यातील जळगाव, सोलापूर, हिंगोली, परभणी, नाशिक आदी जिल्ह्यांत निर्यातक्षम केळींचे उत्पादन होते. शिवाय काही उत्पादक शेतकरी निर्यातदार झाल्यामुळे निर्यातीला गती मिळाली आहे.

या देशांत सर्वाधिक निर्यात..

 भारतातून केळींची सर्वाधिक निर्यात आखाती देशात होते. संयुक्त अरब अमिरात, ओमान, सौदी अरेबिया, इराण, कुवेत, कतार, बहारिन, इराक या देशांना प्रामुख्याने निर्यात केली जाते.

‘अपेडा’च्या वतीने निर्यातक्षम केळी बागांची नोंदणी करण्यासाठी ‘बनाना नेट’ या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून या संकेतस्थळाचे नियमन केले जाते. केळी उत्पादकांना निर्यातक्षम केळी उत्पादनाचे प्रशिक्षण, माहिती देण्यात येत आहे. आखाती देशांमध्ये सर्वाधिक केळी निर्यात होत आहेत. सर्वाच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून केळी निर्यात वाढत आहे.

-गोविंद हांडे, निर्यात सल्लागार, कृषी विभाग

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase banana exports maharashtra forefront large increase banana exports country ysh