पुणे : खरीप हंगामात तुरीसह अन्य कडधान्यांच्या लागवडीत झालेली घट आणि कडधान्यांच्या काढणीच्या वेळी बसलेला अवकाळीचा फटका, यामुळे देशात तूर आणि मुगाच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. तसेच आयात केलेली तूर ग्राहकांच्या पसंतीस उतरत नसल्यामुळे किरकोळ बाजारात तूरडाळीचे दर १६० ते २०० रुपयांवर गेले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरीप हंगामातील तूर बाजारात येऊ लागली आहे. तुरीला २०२४ साठी केंद्र सरकारने सात हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. पण नव्या तुरीची आवक होताच बाजारातील दर सरासरी नऊ ते १० हजार रुपये प्रति क्विंटलवर गेले आहेत. काढणीच्या वेळी तूर पावसात भिजल्यामुळे दर्जा घसरला आहे. खरेदी केलेली तूरडाळ मिल्समध्ये प्रक्रियेसाठी नेल्यानंतर उताऱ्यात घट दिसून येत आहे. एक क्विंटल तुरीपासून जेमतेम ६० ते ७० किलो तूरडाळ तयार होत आहे, तीही अपेक्षित दर्जाची नसते. एक किलो तुरीपासून तूरडाळ तयार करण्याचा खर्च साधारण ३० ते ४० रुपये आहे. प्रति क्विंटल सरासरी दहा हजार रुपयांनी खरेदी, प्रति क्विंटल चार हजार रुपये प्रक्रिया खर्च आणि उताऱ्यात होत असलेली घट आदी कारणांमुळे तुरडाळीचे दर सरासरी १६० ते २०० रुपयांपर्यंत गेले आहेत, अशी माहिती कडधान्यांचे व्यापारी नितीन नहार यांनी दिली.

हेही वाचा >>>उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मध्यस्थीनंतर बदलला निर्णय; वगळलेल्या खेळांचा शिवछत्रपती पुरस्कार यादीत समावेश

उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घट

केंद्र सरकारने यंदा ३४.२१ लाख टन तूर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. प्रत्यक्षात उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घट होण्याचा अंदाज आहे. साधारण ३० लाख टनांपर्यंत उत्पादन होण्याचा अंदाज आहे. पण, देशाची एक वर्षांची गरज ४६ लाख टनांची आहे. त्यामुळे वर्षभर तुरीची टंचाई आणि भाववाढीचा सामना करावा लागणार आहे. मुगाचे उत्पादन १४.०५ लाख टन आणि उडदाचे १५.०५ लाख टन होईल, असा सरकारचा अंदाज होता. त्यातही २५ टक्क्यांपर्यंत घटीचा अंदाज आहे.

हेही वाचा >>>मोठी बातमी! तलाठी भरती परीक्षेची अंतिम निवड यादी जाहीर

केंद्राची बाजारभावाने खरेदी

केंद्र सरकार कोणत्याही शेतीमालाची हमीभावाने खरेदी करते. पण, तुरीच्या उत्पादनात घट होण्याच्या भीतीने सरकारने हमीभावाने नाही तर बाजारभावाने तूर खरेदी करण्याची घोषणा डिसेंबरच्या अखेरीस केली होती. ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’कडून ही खरेदी होणार आहे. खुल्या बाजाराचा आढावा घेऊन दररोज खरेदीचा भाव जाहीर करण्यात येणार आहे. केंद्र सरकार साधारणपणे दहा लाख टनांपर्यंत तूर खरेदी करू शकते. केंद्राच्या या घोषणेमुळेही तुरीच्या दरात तेजी आली आहे.

कारणे काय?

’ लागवडीतील घट, मोसमी पावसाची ओढ आणि काढणीवेळी बसलेल्या अवकाळीच्या तडाख्यामुळे कडधान्ये उत्पादनात घटीचा अंदाज. 

’ कडधान्यांचे एकूण उत्पादन यंदा ७१.१८ लाख टनांवर जाण्याचे अनुमान असल्याची ‘इंडियन पल्सेस अ‍ॅण्ड ग्रेन्स असोसिएशन’ची माहिती. 

देशात ३० लाख टन तुरीच्या उत्पादनाचा अंदाज आहे, प्रत्यक्षात ४६ लाख टन तुरडाळीची गरज असते. म्यानमारहून तूर आणि तुरडाळीची आयात सुरू झाली आहे. – बिमल कोठारी, अध्यक्ष, इंडियन पल्सेस अ‍ॅण्ड ग्रेन्स असोसिएश

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in turdal prices due to fall in production amy
First published on: 24-01-2024 at 03:33 IST