इंदापूर : घाटमाथ्यावर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. धरण जुलै महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरले असल्याने संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

या धरणातून मंगळवारी दुपारनंतर ४० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. रात्री साडेआठनंतर ६० हजार क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

यंदा जुलै महिन्यातच धरण शंभर टक्के भरले आहे. विसर्गात वाढ केल्याने इंदापूरसह दौंड परिसरातील नदीकाठच्या गावांतील पाणीपातळी वाढली आहे.