इंदापूर : यंदा अतिवृष्टीमुळे उजनी धरण लवकरच भरले असून, पाण्याच्या विसर्गामुळे मत्स्यबीज मोठ्या प्रमाणात वाहून गेले असताना जलाशयात ‘हेलिकॉप्टर’ माशांचा वेगाने वाढणारा उपद्रव ही मच्छीमारांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शोभेचा मासा म्हणून घरगुती मत्स्यालयात पाळल्या जाणऱ्या या माशांची संख्या वाढत चालली असून, पारंपरिक माशांवर संकट येत आहे.
सध्या उजनी जलाशयात पारंपरिक गोड्या पाण्यातील माशांचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. जलाशयात ‘हेलिकॉप्टर’ माशांचा वेगाने वाढणारा उपद्रव ही मच्छीमारांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शोभेचा मासा म्हणून घरी पाळले जाणारे हे मासे कालांतराने पाण्यात सोडले जातात. हे मासे गोड्या पाण्यात सहजपणे वाढतात आणि मोठ्या प्रमाणात पसरतात. त्यांच्या शरीरावरील काटेरी शल्कांमुळे हे मासे जाळ्यात अडकतात आणि जाळ्यांचे नुकसानही मोठ्या प्रमाणात होते. हेलिकॉप्टर माशांच्या वाढीमुळे जाळ्यात अडकून जाळी फाटत असल्याच्या तक्रारी उजनीतील अनेक मच्छीमारांनी केल्या आहेत.
पूर्वी रोहू, मरळ, कटला, वाम, घोगऱ्या, आहेर यांसारख्या गोड्या पाण्यातील मास मोठ्या प्रमाणात असायचे. आता ‘तिलापी’चे प्रमाण जास्त आहे. ही विदेशी जातही स्थानिक मत्स्यप्रजातींसाठी धोकादायक ठरत आहे. तिलापी मासा लवकर वाढतो. मात्र, अन्य माशांच्या अन्नसाखळीत हस्तक्षेप करून त्यांच्या वाढीस अडथळा आणतो.
‘सध्या उजनी धरणात कोळंबी दिसू लागली आहे, ही आमच्यासाठी नवी आशा आहे. नैसर्गिकरित्या कोळंबी वाढणे म्हणजे पाण्याच्या गुणवत्तेत काही बदल घडत आहेत. राज्य सरकारने कोळंबी बीज सोडण्याचे नियोजन केले, तर मत्स्य उत्पादनात मोठी वाढ होईल. कोळंबीचा बाजारभावही चांगला असतो. त्यामुळे मच्छीमारांचे उत्पन्न वाढून आर्थिक स्थैर्य येईल. मत्स्य संवर्धन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. आणि स्वतंत्र कोळंबी संवर्धन प्रकल्प राबवावा. – कांतीलाल नगरे, मच्छीमार, पळसदेव