लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शहरातील विविध विज्ञान संस्था, शिक्षण संस्थांतर्फे विज्ञानप्रेमींना मेजवानी मिळणार आहे. विज्ञान दिनी (२८ फेब्रुवारी) खुला दिवस, व्याख्याने, विज्ञान प्रदर्शन, शास्त्रज्ञांशी संवाद असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

आघारकर संशोधन संस्थेत सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत जैवऊर्जा, करंडक वनस्पती, बुरशी, औषधी आणि पीक वनस्पती, जीवाश्म आदींचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. त्याशिवाय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जैवतंत्रज्ञान, आर्किया आणि विषाणू, करंडक वनस्पती आणि पिकांच्या जाती या विषयांवरील व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. हे कार्यक्रम सर्वांसाठी खुले आहेत.

आणखी वाचा-बेरोजगारांना संधी! २० हजारांपेक्षा जास्त रिक्त पदांवर भरती!

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतर्फे (आयसर पुणे) ज्येष्ठ सांख्यिकी भौतिकशास्त्रज्ञ डॉ. दीपक धर, अरविंद गुप्ता यांच्यासह संस्थेतील शास्त्रज्ञांची व्याख्याने होणार आहेत. विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी वैज्ञानिक प्रकल्पांची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. त्याशिवाय मलेरियावरील लशीचा शोध, दैनंदिन विज्ञान, विश्वाचा सर्वांत छोटा तुकडा अशा विषयांवरील मार्गदर्शन सत्रे, प्रश्नमंजुषा असे उपक्रम होणार आहेत. इंद्राणी बालन सायन्स ॲक्टिव्हिटी सेंटरमध्ये तयार केलेल्या अभिनव विज्ञान आणि गणित प्रतिकृती पाहता येणार आहेत.

आंतरविद्यापीठीय खगोल आणि खगोलभौतिकी केंद्रात (आयुका) खुला दिवस होणार आहे. त्यात संस्था पाहण्यासह विविध दुर्बिणींची प्रारुपे पाहता येतील. आदित्य एल १ ही सौर मोहीम, सूर्य आणि सौरभौतिकी, गुरुत्वीय लहरी, कृष्णविवर आणि लायगो इंडिया, क्वांटम तंत्रज्ञान या विषयांवरील प्रात्यक्षिके, जितेंद्र जोशी यांचे ‘सूर्यमंडळाचा प्रवास’, स्वर्णिम शिर्के यांचे ‘वैश्विक संग्रहालयाची भेट’, दिशा सावंत आणि अथर्व पाठक यांचे ‘सिटिझन सायन्स’, ए. एन. रामप्रकाश यांचे ‘आपण आपल्या सूर्याला किती चांगले ओळखतो’ अशी व्याख्याने, ॲस्ट्रो ट्रेजर हंटसारखे उपक्रमही होणार आहेत. त्याशिवाय ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर आणि आयुकातील शास्त्रज्ञ यांच्याशी प्रश्नोत्तरांद्वारे संवादही साधता येणार आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एनसीएल) सकाळी साडेदहा वाजता आयआयटी मुंबईतील डॉ. रुची आनंद यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच विद्यार्थी, वैज्ञानिक आणि कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्थेत (एनसीसीएस) सकाळी साडेदहा वाजता पर्सिस्टंटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे यांचे ‘व्हाय रीसर्च करिअर इन इंडिया इज सो एक्सायटिंग’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्याशिवाय जैवतंत्रज्ञानातील अद्ययावत सुविधा, प्रयोगशाळा पाहण्यासाठी खुल्या असतील.

आणखी वाचा-पिंपरी : अमृत भारत योजनेंतर्गत चिंचवड, देहूरोड, लोणावळा रेल्वे स्थानकांचा विस्तार

पिंपरी चिंचवड येथील सायन्स पार्कमध्येही विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहे. त्यात शालेय विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रकल्पांचे प्रदर्शन, पोस्टर प्रदर्शन, विज्ञान चित्रपट, शास्त्रज्ञांशी संवाद, प्रात्यक्षिके अशा उपक्रमांचा समावेश आहे. राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रातर्फे (एनसीआरए) नारायणगावजवळच्या खोडद येथील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप येथे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच या वेळेत होणाऱ्या या प्रदर्शनात राज्यभरातील विद्यार्थ्यांचे वैज्ञानिक प्रकल्प मांडण्यात येतील.