पुणे : २० मे २०२५. वेळ दुपारी ३ वाजताची. पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात दिमाखात उभ्या असलेल्या ‘इंटर युनिव्हर्सिटी फॉर अॅस्ट्रोनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स’ अर्थात ‘आयुका’मध्ये ही दुपारही इतर दिवसांसारखीच; अध्यापनाची, संशोधनाची, भरपूर कामाची… एरवी संस्थेच्या संस्थापकाचे निधन झाल्यावर सुटी द्यायची प्रथा पडलेल्या आपल्या व्यवस्थेत असेही होऊ शकते, हे यातील वेगळेपण!

ते का घडू शकले, या प्रश्नाचे उत्तर ‘आयुका’च्या संस्थापकाने, म्हणजे डॉ. जयंत नारळीकरांनी दोनच महिन्यांपूर्वी लिहिलेल्या ‘ब्लॉग’मध्ये सापडते. २४ मार्च २०२५ च्या ‘ब्लॉग’मध्ये ते लिहितात, ‘संस्थापकाने संस्थेच्या रुजण्यात भलेही मोठे योगदान दिले असेल, पण संस्थापक तेथून बाजूला झाल्यानंतर ती संस्था कशी काम करते, यातच संस्थेच्या यशाची खरी कसोटी होत असते…’ ज्या संस्थेचे रोपटे लावून तिला अक्षरश: आपल्या मुलाप्रमाणे ज्यांनी वाढवले, त्या डॉ. जयंत नारळीकर यांनी घालून दिलेल्या शिस्तीनुसार ‘आयुका’चे काम मंगळवारीही नेहमीसारखेच सुरू राहिले आणि ही कसोटी त्यांनी पार केली. नारळीकर यांचे निधन झाल्याची बातमी सर्व प्राध्यापक, संशोधक, कर्मचारीवर्गाला कळवली गेली. पण, त्यांनी ‘घडविले’ल्या या संस्थेने काम सुरू ठेवून त्यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली. ‘यशस्वी संस्था उभारलेल्यांना योग्य वेळ आल्यावर इतरांना जबाबदारी दिलेले आणि नंतर दूर अंतरावरून तिची प्रगती पाहणारे अधिक भाग्यवान असतात,’ असे डॉ. नारळीकरांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले होते.

विज्ञान दिनी उत्तरे आणि प्रश्नही!

डॉ. जयंत नारळीकर ‘आयुका’तील विज्ञान दिनाचा कार्यक्रमाचा सहसा चुकवत नसत. या दिवशी उपस्थित विद्यार्थी आणि विज्ञानात रस असणाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणे, त्यांच्याशी संवाद साधणे त्यांना आवडत असे. यंदाही २८ फेब्रुवारीला प्रकृती फारशी बरी नसतानाही ते कार्यक्रमाला उपस्थित होते. ‘मॅथेमॅटिक्स विदाउट नंबर क्रंचिंग’ असा विषय घेऊन त्यांनी एक सादरीकरणही केले. या वेळी सुरुवातच करताना ते म्हणाले, की आज मी तुम्हालाही प्रश्न विचारणार आहे. पुढे जवळपास पाऊण तास हा कार्यक्रम रंगत गेला.