तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणामुळे उद्योग क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. त्यामुळेच सध्याचा काळ हा नवकल्पनांचा आणि कौशल्य विकासाचा आहे. अशा काळात उदयोन्मुख क्षेत्रातील संधी लक्षात घेऊन आता औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) काही नावीन्यपूर्ण बदल होऊ घातले आहेत. त्यात प्रामुख्याने यंदापासून काही नव्या शाखांतील अभ्यासक्रम सुरू होणार आहेत.

त्यामुळे विद्यार्थ्यांना नव्या जगाचे धडे दिले जाणार आहेत. उद्योगांच्या सहकार्याने सुरू होणाऱ्या या अभ्यासक्रमांमुळे कुशल आणि रोजगारक्षम मनुष्यबळ तयार होऊन उद्योग क्षेत्राची गरज भागण्यास मदत होणार आहे.

कौशल्य विकास ही संकल्पना गेल्या काही वर्षांत विकसित झाली असली, तरी अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आयटीआय संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. आयटीआय प्रशिक्षण घेऊन नोकरी करण्याशिवाय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधीही मिळतात. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत ‘आयटीआय’कडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलू लागला आहे.

दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही ‘आयटीआय’कडे ओढा असल्याचे प्रवेश प्रक्रियांतून दिसून आले आहे. त्याशिवाय कुशल मनुष्यबळाची गरज असल्याने उद्योग क्षेत्रातील कंपन्याही ‘आयटीआय’बरोबर काम करू लागल्याने प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना लगेचच नोकऱ्याही मिळू लागल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर, आता ‘आयटीआय’मध्येही अनेक बदल होऊ घातले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून यंदापासून ‘आयटीआय’मध्ये न्यू एज कोर्सेस अर्थात नव्या काळाचे अभ्यासक्रम राबवण्याची घोषणा कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नुकतीच केली.

त्यानुसार आता राज्यभरातील ‘आयटीआय’मध्ये एअरोनॉटिकल फिटर, थ्रीडी प्रिंटर, मेकेट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक मोटर व्हेईकल, सोलार टेक्निशियन अशा अभ्यासक्रमांचा समावेश आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील ‘आयटीआय’मध्येही या अभ्यासक्रमांची अंमलबजावणी करण्याचे नियोजन व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाकडून करण्यात येत आहे. येत्या काही वर्षांत विकसित होणाऱ्या क्षेत्रांनुसार हे अभ्यासक्रम राबवले जाणार आहेत.

औद्योगिकदृष्ट्या आघाडीवर असलेल्या पुणे जिल्ह्यात वाहन, संरक्षण, उत्पादन, वैद्यकीय, माहिती तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांतील कंपन्या कार्यरत आहेत. त्यामुळे या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना करिअरसंधी निर्माण होऊ शकतात.

व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या पुणे प्रादेशिक कार्यालयातील शिक्षण निरीक्षक किशोर उबाळे सांगतात, ‘उद्योगांच्या सहकार्याने पुणे जिल्ह्यातील ‘आयटीआय’मध्ये नवीन अभ्यासक्रम राबवण्याचे नियोजन आहे. एक-दोन वर्षे मुदतीचे हे अभ्यासक्रम असणार आहेत.

या अभ्यासक्रमांसाठी आवश्यक साधनसामग्रीही उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने प्रशिक्षण मिळेल. आताच्या काळात सौरऊर्जा, विद्युत वाहने अशी क्षेत्रे उदयाला येत आहेत. त्यात अनेक संधी निर्माण होत असल्याने, तसेच त्यात कुशल मनुष्यबळाची गरज असल्याने या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून उद्योगांना कुशल मनुष्यबळाची उपलब्धता, विद्यार्थ्यांना झटपट नोकरीच्या संधी, असा दुहेरी फायदा होणार आहे. त्यामुळे येत्या काळात विद्यार्थ्यांचा ‘आयटीआय’कडे कल वाढण्यास मदत होईल.’

आजूबाजूचे जग बदलत असताना शिक्षणातही त्याचे पडसाद उमटणे आवश्यक आहे. ‘आयटीआय’मध्ये विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहण्याइतक्या कौशल्यांच्या पलीकडे जाऊन आता त्यांना नव्या जगाचे धडे देण्याची कल्पना स्वागतार्ह आहे. मात्र, त्याला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा मिळतो, त्यावरच भविष्य अवलंबून असेल.

chinmay.patankar@expressindia.com