पुणे : नवरात्रोत्सवात पादचारी महिलांकडील दागिने हिसकाविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नगर रस्त्यावरील खराडी भागात दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेकडील एक लाख सात हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना घडली.
याबाबत एका महिलेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, तक्रारदार महिला आणि तिची मैत्रीण खराडीतील अनुसया पार्क भागातून सोमवारी (२९ सप्टेंबर) रात्री दहाच्या सुमारास निघाल्या होत्या. त्यावेळी आरपीएस सोसायटीसमोर दुचाकीस्वार चोरटयांनी तक्रारदार महिलेच्या गळ्यातील एक लाख सात हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेली.
महिलेेने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात दुचाकीवरुन पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक गोडसे तपास करत आहेत.
नवरात्रोत्सवात पादचारी महिलांकडील दागिने हिसकाविण्याच्या तीन घटना घडल्या आहेत. बालेवाडी, हडपसर, तसेच खराडी भागात दागिने हिसकावण्याच्या घटना घडल्या आहेत.
पीएमपीएल प्रवासी महिलेची दीड लाखांची बांगडी लंपास
पीएमपीएल प्रवासी महिलेच्या हातातील दीड लाख रुपयांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना स्वारगेट स्थानक परिसरात घडली. याबाबत एका महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला महर्षीनगर भागात राहायला आहेत. त्या सोमवारी (२९ सप्टेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास स्वारगेट पीएमपी स्थानक परिसरात थांबल्या होत्या. धायरीकडे जाणाऱ्या पीएमपीएल बसची वाट पाहत त्या थांबल्या होत्या.
बसमध्ये त्या प्रवेश करत होत्या. त्यावेळी गर्दीत चोरट्यांनी कटरचा वापर करुन महिलेच्या हातातील दीड लाख रुपयांची बांगडी लांबविली. पोलीस उपनिरीक्षक केतकार तपास करत आहेत. शहर परिसरात पीएमपी प्रवासी महिलांकडील दागिने लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गर्दीत चोरटे महिलांच्या पिशवीतून दागिने, तसेच कटरचा वापर करून बांगड्या लांबवून पसार होतात.