पुणे : डेक्कन परिसरातील सह्याद्री रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर पती व पत्नीचा मृत्यू झाल्याप्रकरणी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीच्या अहवालावरील कार्यवाही दोन महिन्यांनंतरही प्रलंबित आहे. याच प्रकरणात वैद्यकीय हलगर्जीपणाची चौकशी करण्यासाठी ससून सर्वोपचार रुग्णालयाने नकार दिल्याने आता डेक्कन पोलिसांनी मुंबईतील जे. जे. रुग्णालयाला चौकशीसाठी पत्र दिले आहे.
सह्याद्री रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणानंतर बापू कोमकर यांचा १५ ऑगस्टला मृत्यू झाला होता, तर दाता असलेली त्यांची पत्नी कामिनी कोमकर यांचा २२ ऑगस्टला मृत्यू झाला. रुग्णांच्या नातेवाइकांनी याप्रकरणी सह्याद्री रुग्णालयावर हलगर्जीपणाचा आरोप केला होता. याप्रकरणी चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, समितीची चौकशी पूर्ण होईपर्यंत सह्याद्री रुग्णालयातील प्रत्यारोपण शस्त्रक्रियांना स्थगिती देण्यात आली.
कोमकर कुटुंबीयांच्या नातेवाइकांनी याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याआधारे डेक्कन पोलिसांनी ससून रुग्णालयाला सप्टेंबर महिन्यात पत्र पाठवून याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली होती. ससून रुग्णालय प्रशासनाने पोटविकारतज्ज्ञ आणि यकृत शल्यचिकित्सक नसल्याचे कारण पुढे करून या चौकशीस नकार दिला. त्यामुळे डेक्कन पोलिसांनी जे. जे. रुग्णालयाला चौकशीसाठी पत्र गेल्या आठवड्यात दिले आहे. त्यामुळे याप्रकरणी वैद्यकीय हलगर्जीपणाची चौकशी जे. जे. रुग्णालयातील समिती करणार आहे, अशी माहिती डेक्कन पोलिसांनी दिली.
उच्चस्तरीय समितीच्या अहवालाची प्रतीक्षा
उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी इंटरनॅशनल लिव्हर ट्रान्सप्लांट सोसायटी, चेन्नईचे अध्यक्ष आणि यकृत प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. मोहम्मद रेला असून, सदस्य सचिवपदी आरोग्यसेवा उपसंचालक डॉ. भगवान पवार आहेत. समितीची बैठक २९ ऑगस्टला दूरदृश्य प्रणालीद्वारे झाली होती. त्यानंतर २५ सप्टेंबरला समितीने सह्याद्री रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली. त्याच दिवशी समितीची बैठकही झाली. मात्र, या समितीच्या अहवालाची उद्याप प्रतीक्षा आहे.
डेक्कन पोलिसांचे पत्र आणि वैद्यकीय अहवाल ससूनला मिळाले. मात्र, ससूनमध्ये पोटविकारतज्ज्ञ आणि यकृत शल्यचिकित्सक नसल्याने या चौकशीस नकार देण्यात आला. याप्रकरणी चौकशीसाठी हे दोन्ही तज्ज्ञ आवश्यक असून, नेमके तेच रुग्णालयात नसल्याने चौकशी करणे शक्य नव्हते. – डॉ. यल्लपा जाधव, वैद्यकीय अधीक्षक, ससून सर्वोपचार रुग्णालय
