पुणे : कसबा विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने आणि नवनिर्वाचित काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्यात शाब्दिक युद्ध रंगण्यास सुरूवात झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजप नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या आरोपाला हेमंत रासने यांनी समाजमाध्यमातून उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलण्याइतके तुम्ही मोठे नाहीत, असे उत्तर रासने यांनी धंगेकर यांना दिले आहे.

हेही वाचा >>> कसब्यात धंगेकरांच्या विजयाचा नेमका अर्थ काय? प्रकाश आंबेडकरांनी केलं महत्त्वाचं विधान; म्हणाले, “या निकालातून…”

फडणवीस भाजपला रसातळाला घेऊन जाणार आहेत. सत्ता गेल्यावर लोक त्यांना नमस्कारही करणार नाहीत. विरोधकांना राजकीय जीवनातून उद्धवस्त करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचे एकमेव उद्दिष्ट आहे. लोकशाहीची हत्या कशी करायची हे फडणवीस यांच्याकडून शिकावे.  हेमंत रासने यांना त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी पाडले आहे,  असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला होता.  त्याला रासने यांनी उत्तर देताना धंगेकर यांना सल्लाही दिला आहे.

पोटनिवडणुकीत  विजयी झालात, त्याबद्दल अभिनंदन. देवेंद्रजींविषयी केलेले वक्तव्य वाचनात आले. ज्या विधानभवनात पाऊल ठेवणार आहात, त्या विधानभवनाचे पर्यायाने या महाराष्ट्राचे नेतृत्त्व देवेंद्रजींनी सलग पाच वर्षे केले आहे. त्यामुळे त्यांच्या विषयी बोलताना तारतम्य बाळगा.  देवेंद्रजींच्या कारकीर्दीवर बोलावे इतके मोठे तुम्ही नक्कीच नाहीत. कसब्याच्या जनतेने ज्यासाठी  निवडून दिले आहे, त्या जबाबदारीचे भान ठेवा.  राजकारण करायला खूप विषय आहेत, असे रासने यांनी म्हटले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kasba by election results congress mla ravindra dhangekar bjp hemant rasane pune print news apk 13 zws