पुणे : पोलीस शिपायाला मारहाण करणाऱ्या तरुणाला खराडी पोलिसांनी अटक केली. पोलीस शिपायाला धक्काबुक्की करुन आरोपी तरुणाने गणवेश फाडला. सरकारी कामात अडथळा आणणे, तसेच मारहाण केल्या प्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय अंगद लंगोटे (वय २८,रा. थिटे वस्ती, खराडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई अमोल जाधव यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर गुन्हे रोखणे, तसेच गस्त घालण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून काॅप्स-२४ योजना सुरू करण्यात आली आहे. २५ सप्टेंबर राेजी रात्री साडेआठच्या सुमारास खराडी परिसरात आरोपी अक्षय लंगोटे हा एका महिलेला शिवीगाळ करत होता. या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनंतर पोलीस शिपाई अमोल जाधव तेथे गेले.
त्यावेळी आरोपी लंगोटे हा एका महिलेला शिवीगाळ करत होता. पोलीस शिपाई जाधव यांनी महिलेला शिवीगाळ करू नको, असे सांगितले. लंगोटे याने जाधव यांच्या कानशिलात लगावली. जाधव यांना धक्काबुक्की करून गणवेश फाडला. त्यांच्याबरोबर असलेल्या गृहरक्षक दलातील जवानाला धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी लंगोटे याला अटक करण्यात आली आहे.