पुणे : कर्जत जामखेडमध्ये काम करायला माणूस नाही म्हणून दुसरीकडून आणावा लागला. त्याच्याविरोधात एकदा पडल्यानंतर आमदार झालो. दुसऱ्यांदा थोडक्यात संधी हुकली तर एक महिन्यामध्ये सभापती झालो. आपल्याशी स्पर्धा करणारे आता मागे गेले आहेत आणि मी खूप पुढे गेलो आहे, अशा शब्दांत विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी शनिवारी भाष्य केले. मंत्री झालो असतो तर एकच खाते मिळाले असते. पण, मंत्री नसलो तरी सगळ्या मंत्र्यांकडून समाजाची वैयक्तिक, सार्वजनिक आणि संस्थात्मक काम करून घेऊ शकतो, अशी ग्वाही त्यांनी दिली. विधानपरिषदेच्या सभापतीपदी नियुक्ती झाल्याबद्दल धनगर समाजाच्या वतीने राम शिंदे यांचा क्रीडा आणि युवक कल्याणमंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी शिंदे बोलत होते. डाॅ. शशिकांत तरंगे, उज्ज्वला हाके यांच्यासह समाजातील मान्यवर या वेळी उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिंदे म्हणाले, ‘सर्वाधिक मते संपादन करूनही कमी मतांनी पराभव झालेला राज्याच्या २८८ मतदारसंघातील मी एकमेव उमेदवार आहे. आता सभापती या नात्याने आमदारांच्या विशेषाधिकाराचे संरक्षण करण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. समाजाच्या कार्यकर्त्याला कॅबिनेटमंत्री होण्यासाठी इतकी वर्षे तर सभापती होण्यासाठी ७८ वर्षे जावी लागली. पूर्वी आपल्यासाठी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय ही खाती ठरलेली असायची. अण्णा डांगे हे पहिले कॅबिनेटमंत्री झाले. आता राम शिंदे, दत्ता भरणे हे अपवाद ठरले. निवडणुकीमध्ये ज्याने पाडले त्यालाही बोलायला संधी द्यायची की नाही हे आता मी ठरवणार.’

पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोदी साहेबांबरोबर लॉनमध्ये बसलेला फोटो प्रसिद्ध झाला आणि राम शिंदे यांचा आदर वाढला ही अहिल्यादेवी यांची पुण्याई आहे, अशी भावना शिंदे यांनी व्यक्त केली. मंत्री झालो असतो तर एकच खाते मिळाले असते. मंत्री नसलो तरी वैयक्तिक, सार्वजनिक आणि संस्थात्मक स्वरूपाचे कोणतेही काम सांगा. सगळ्या मंत्र्यांना सांगून करून घेऊ शकतो, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Legislative council chairman ram shinde testimony regarding the work of the society pune print news vvk 10 amy