काही वर्षांपूर्वी पुण्याच्या मध्यवर्ती भागातील एका रस्त्यावर एक फलक झळकला होता, ‘मी येतोय…’ या फलकावरून शहरात भरपूर चर्चा रंगली होती. ‘हे कुणी लावले असेल’, ‘यात काही राजकीय संदेश आहे का,’ असेही प्रश्न उपस्थित झाले होते. अर्थात, काही दिवसांतच या फलकाचा उलगडा झाला. हा एका गणेश मंडळाचा फलक होता आणि गणेशोत्सव दोन महिन्यांवर असतानाच त्यांनी हा फलक लावून त्याबद्दल उत्सुकता निर्माण केली होती. पुणेकरांचे गणेशोत्सवावरील प्रेम हे असे आहे. या मंडळाने तर उत्सवापूर्वी दोन महिने फलक लावला होता; पण गणेशोत्सवात रमणारे अनेक कार्यकर्ते असे आहेत, की अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशीच त्यांची पुढच्या वर्षीच्या उत्सवाची तयारी सुरूही झालेली असते! समाज जोडणारा, कार्यकर्ता घडविणारा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मनामनांत आनंद पेरणारा असा हा उत्सव. लाडक्या गणरायाच्या प्रसन्न मूर्तीसमोर हात जोडून नतमस्तक झालेला भाविक डोळे बंद करून तल्लीन होऊन त्याच्याकडे त्याचे जे काही असेल, ते मागणे मागतो, त्याच्या आगमनाचा जल्लोष करतो, त्याची आरती गातो, सर्जनशीलतेला उपक्रमशीलतेची जोड देतो, देखाव्यांमधून सामाजिक-राजकीय प्रश्नांवर अभिव्यक्त होतो आणि विसर्जनाच्या वेळी भावुकही होतो. या सगळ्यांतील निरागसता हे या उत्सवाचे खरे संचित.

अर्थात, पुण्याच्या गणेशोत्सवाला केवळ भावनिक धागा नाही, तर सामाजिक अधिष्ठानही आहे. अडीअडचणीत हाकेला धावून जाणारा, संकटसमयी खंबीरपणे उभा राहणारा आणि सकारात्मक बदल घडविणारा कार्यकर्ता या उत्सवाने दिला. गणेश मंडळे म्हणजे कार्यकर्त्यांची शाळा. या शाळेतून घडणारे अनेकजण पुण्याचे नेतृत्व करण्यापर्यंत पोचले, हेही या पुण्याने पाहिले. या उत्सवातील परंपरा आणि सामाजिक बांधिलकीवर शोधनिबंध लिहिले जातात, पीएचडीही मिळवल्या जातात. हे सारे होते, कारण शंभर वर्षांहून अधिक काळ अखंड सुरू असलेल्या या उत्सवाने पुण्याला मोठे केले आहे आणि मोठे होताना पाहिलेही आहे. हे सगळे उत्तमच आहे. पण, मोठे झालेले, विस्तारलेले हे पुणे आता या उत्सवाकडे आणखी काही मागते आहे. पुण्याचे हे मागणे उत्सवाच्याच निमित्ताने समजून घेता आले, तर अधिक औचित्यपूर्ण. पुणे शहर सध्या विविध कारणांनी अस्वस्थ आहे. एके काळचे पेन्शनरांचे हे शहर आता धावपळीचे महानगर झाले आहे. रस्त्यांना फुटलेले पाय रोज शहराच्या चहूदिशांना रोजीरोटीसाठी धावत असतात. पण, या रस्त्यांची क्षमता संपत चालल्याने वाहतूक कोंडीत घुसमटण्याचा अनुभव हे शहर आताशा घेऊ लागले आहे. त्यातून उद्भवणारे वाद कोणत्या थराला जातील याची शाश्वती उरलेली नाही. रोज पडणारे खून, घडणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटना, चोऱ्या, यामुळे सुरक्षित शहर असा लौकिक असलेल्या पुण्याच्या आसमंतात कधी नव्हे इतकी असुरक्षितता भरून राहिली आहे. सर्वच बाबतीतल्या नियमपालनातील ‘उत्साह’ पाहिला, तर विद्योच्या माहेरघरात शिक्षित बरेच, पण ‘सु’शिक्षित फार नाहीत का, असा प्रश्न पडावा, अशी स्थिती आहे. व्यवस्थेला आलेली मरगळ, ‘चलता है’ वृत्ती, भ्रष्ट कारभार, नागरी प्रश्नांबाबत अनास्था यामुळे या शहरात एक प्रकारची हताशा आहे. त्यातच भर म्हणून की काय, शहर अलीकडच्या काळात निर्नायकी आहे. हे आणखी गंभीर, कारण सामान्य माणसाला कुणी वाली आहे का, हा प्रश्न शहराला छळू लागणे ही त्या शहराची सामाजिक वीण उसवत असल्याचे दुश्चिन्ह असते.

हेही वाचा : Pune Indapur Truck Video : पुण्यात मद्यधुंद ट्रक चालकाचा धिंगाणा! हॉटेल मालकाने जेवण नाकारल्याने हॉटेलमध्ये घातली ट्रक, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

म्हणूनच या शहराचे गणेशोत्सवाकडे मागणे आहे, की या शहराला स्वस्थता लाभू दे. श्री गणेशाच्या आगमनाने आज मने उल्हासित होतील, ती काळजीने काळवंडून जाऊ नयेत.

डीजे, ढोल कानाला गोड लागतील, इतकेच वाजावेत. उत्साहात उन्माद नसू देत आणि उत्सवाचे उत्सवीपण टिकण्यासाठी उत्सवाचा मूळ उद्देश असलेल्या विधायकतेला हातभार लागावेत.

‘मी येतोय…’ असा फलक लावण्यातील निस्सीम भक्ती हे या शहरातील उत्सवाचे पूर्वसुकृत आहे. ते टिकावे म्हणूनच, यंदाचा उत्सव पुणेकरांसमोरच्या विघ्नांचे विसर्जन करणारा ठरावा, अशी गणरायाकडे प्रार्थना. ती करताना, इतकेच म्हणावे, ‘अवघी विघ्ने नेसी विलया, आधी वंदू तुज मोरया’.

गणपत्ती बाप्पा मोरया!

siddharth.kelkar@expressindia.com