पुणे : रिक्षा प्रवासी तरुणाला मारहाण करुन रिक्षाचालक आणि साथीदारांनी त्याच्याकडील मोबाइल संच, तसेच रोकड असा मुद्देमाल लुटून नेल्याची घटना पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर परिसरात घडली. या प्रकरणी रिक्षाचालकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत एका तरुणाने लोेणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, रिक्षाचालकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण लोणी काळभोर परिसरातील कदमवाक वस्तीत राहायला आहे. तो मूळचा धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात असलेल्या उदतपूर गावचा रहिवासी आहे. दोन दिवसांपूर्वी तो दुपारी साडेचारच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरुन रिक्षातून निघाला होता. रिक्षात चालकासह चौघे साथीदार हाेते. रिक्षाचालकाने कदमवाक वस्ती परिसरातील एका हाॅटेलजवळ रिक्षा थांबविली.

तरुणाला मारहाण करुन त्याच्यकडील मोबाइल संच आणि खिशातील ३५०० रुपये असा मुद्देमाल लुटून रिक्षाचालक आणि साथीदार पसार झाले. घाबरलेल्या तरुणाने मंगळवारी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक सोनटक्के तपास करत आहेत.