पुणे : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असणाऱ्या ‘महाकुंभ’ला जाण्यासाठी भाविकांची वाढती मागणी पाहता, हवाई कंपन्यांनी प्रवासी भाडेदरांत वाढ केली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्यांनी यात तातडीने हस्तक्षेप करून दर नियंत्रित करण्यासाठी सूचना कराव्यात, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने केली आहे. येत्या तीन दिवसांत दर नियंत्रित केले नाही, तर देशभरातील विमानतळांवर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदाच्या वर्षी प्रयागराज येथील सुरू असणारा ‘महाकुंभ’मेळा १४४ वर्षातून पहिल्यांदा होत आहे. प्रयागराज येथे जाण्यासाठी रेल्वे आरक्षण पूर्ण झाल्याने हवाई वाहतुकीचा पर्याय निवडला जात आहे. मात्र, हवाई कंपन्यांनी या वेळेचा फायदा उठवून, भाडेदरात मोठी वाढ केली आहे.

‘केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण प्राधिकरणाच्या २०१९ च्या कायद्यानुसार प्रवाशांच्या हिताच्या दृष्टिकोनातून कोणत्याही ठिकाणावरून विमानाने प्रवास करण्यासाठी साधारणत: पाच ते आठ हजारांपर्यंत भाडेदर निश्चित करण्यात आले आहे. मात्र, या तत्त्वाचे उल्लंघन करून हवाई कंपन्यांकडून थेट ३२ ते ४० हजारापर्यंत भाडेदर आकारले जात आहेत. मंगळवारी (२८ जानेवारी) मुंबई ते प्रयागराज हवाई प्रवासासाठी ६० हजार रुपये दर आकारण्यात आला. हवाई कंपन्यांच्या या कारभाराची कुठलीच दखल अद्याप घेण्यात आलेली नाही,’ अशी माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रमुख श्रीकांत जोशी यांनी दिली.

हवाई कंपन्यांकडून प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक तातडीने थांबविण्यासाठी केंद्रीय मंत्रालयाकडून तातडीने हस्तक्षेप करून हवाई प्रवासाचे दर नियंत्रणात आणावे. तसेच, प्रत्येक विमानतळावरून थेट प्रयागराज येथे विमानसेवा सुरू करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राममोहन नायडू, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या मुख्य आयुक्त निधी खरे, नागरी उड्डाण मंत्रालयाचे संचालक फैज अहमद किदवाई यांच्याकडे केली आहे, असेही जोशी यांनी नमूद केले आहे.

अपेक्षित विमानतळावरून प्रयागराज येथील ‘महाकुंभ’ला जाण्यासाठी विमान कंपन्यांकडून पुढील तीन दिवसांत दर नियंत्रण केले नाही, तर अखिल भारतीय ग्राहक पंचायत देशभरातील सर्व विमानतळांवर आणि विमान कंपन्यांच्या कार्यालयांपुढे आंदोलन करण्यात येईल. – श्रीकांत जोशी, विधी आयामु प्रमुख, मध्य महाराष्ट्र प्रांत, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रमुख

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahakumbh airline companies increase fares grahak panchayat pune print news vvp 08 ssb