पुणे : राज्यातील चार वर्षे मुदतीच्या अभियांत्रिकी, तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रम प्रथम वर्ष, तसेच पाच वर्षे मुदतीच्या अभियांत्रिकी तंत्रज्ञान एकात्मिक पदवी अभ्यासक्रम प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) शुक्रवारी जाहीर केले. त्यानुसार २८ जून ते ८ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार असून, १७ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.
सीईटी सेलने प्रवेश प्रक्रियेबाबतची माहिती परिपत्रकाद्वारे जाहीर केली. त्यानुसार २८ जून ते ८ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर २९ जून ते ९ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना ई स्क्रुटिनीसह सुविधा केंद्र, छाननी केंद्रांचा पर्याय उपलब्ध असणार आहे. मात्र, सुविधा केंद्र, छाननी केंद्रासाठी ऑनलाइन वेळ निश्चित करून घेऊन त्या वेळेत पडताळणीची कार्यवाही पूर्ण करावी लागणार आहे.
छाननी केंद्रांची यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. ८ जुलैनंतर नोंदणी केलेले, तसेच छाननी केंद्र, सुविधा केंद्र येथे ९ जुलैनंतर अंतिम केलेले अर्ज केवळ ‘नॉन-कॅप’ जागांसाठीच ग्राह्य धरण्यात येतील. त्यानंतर तात्पुरती गुणवत्ता यादी १२ जुलैला जाहीर करण्यात येणार आहे. या यादीबाबत काही आक्षेप, हरकती असल्यास ते १३ ते १५ जुलै या कालावधीत नोंदवता येणार आहेत. अंतिम गुणवत्ता यादी १७ जुलै रोजी जाहीर केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अधिक माहिती https://cetcell.mahacet.org/ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
एमबीए, एमसीएच्या प्रवेशांचेही वेळापत्रक जाहीर
व्यवस्थापनशास्त्र पदव्युत्तर पदवी (एमबीए), संगणक उपयोजन पदव्युत्तर पदवी (एमसीए) अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचेही वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार २८ जून ते ८ जुलै या कालावधीत उमेदवारांना ऑनलाइन अर्ज नोंदणी करता येणार असून, अंतिम गुणवत्ता यादी १७ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सीईटी सेलने दिली. सीईटी सेलने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ३० जून ते ९ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणी पूर्ण करावी लागणार आहे. त्यात उमेदवारांना छाननी केंद्र, सुविधा केंद्रांसह ई स्क्रुटिनीचाही पर्याय देण्यात आला आहे. १२ जुलै रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर १३ ते १५ जुलै दरम्यान तात्पुरत्या यादीवरील हरकती-सूचना नोंदवता येणार आहेत, असे नमूद करण्यात आले आहे.
© The Indian Express (P) Ltd