पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे बहुप्रतिक्षित शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता परीक्षेचा निकाल सोमवारी (१८ ऑगस्ट) जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यभरातील उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी या बाबतची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेस एकूण २ लाख २८८ हजार ०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ११ हजार ३०८ उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यानंतर उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक किंवा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत सादर करण्याबाबत परीक्षा परिषदेने १६ जुलै २०२५ रोजी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले होते.
या पार्श्वभूमीवर बी.एड. परीक्षा दिलेले ११ हजार ७५६, डी.एल.एड. परीक्षा दिलेले १ हजार ३४२ अशा एकूण १७ हजार ०९८ उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरला होता. १४ जुलैअखेरीस बी.एड. परीक्षा दिलेल्या ९ हजार ९५२, तर डी.एल.एड. परीक्षा दिलेल्या ८२७ अशा एकूण १० हजार ७७९ उमेदवारांनी त्यांची माहिती राज्य परीक्षा परिषदेकडे सादर केली आहे. त्यामुळे या उमेदवारांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक किंवा अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत परीक्षा परिषदेकडे सादर केलेले नाही अशा बी. एड. परीक्षा दिलेल्या ५ हजार ८०४, डीएलएड परीक्षा दिलेल्या ११५ अशा एकूण ६ हजार ३१९ उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात येणार आहे.
त्यामुळे https://www.mscepune.in/dtedola/TAIT2025InfoAppcar.aspx या दुव्याद्वारे दिलेल्या मुदतीत माहिती सादर न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विदयार्थी उमेदवारांची राहील. त्यानंतर याबाबत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.