पुणे : ब्युटी पार्लरमध्ये काम लावण्याचे आमिष दाखवून पश्चिम बंगालहून पुण्यात आणून वेश्या व्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या दलालाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी पश्चिम बंगालमधील दोन तरुणींची सुटका केली. दोन वर्ष छळ सहन केल्यानंतर संधी मिळाल्यावर तरुणींनी पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी केला. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून दोन तरुणींची सुटका केली.
राजू असे अटक करण्यात आलेल्या दलालाचे नाव आहे. त्याची पत्नी मीरा हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, ती पसार झाला आहे. याबाबत एका २२ वर्षाच्या तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू आणि मीरा यांनी पश्चिम बंगालमधील दोन तरुणींना पुण्यात ब्युटी पार्लरमध्ये काम लावून देते, असे आमिष दाखविले. दोघींना पश्चिम बंगालमधील गावाहून पुण्यात आले. ब्युटी पार्लरमध्ये कामाला न लावता तरुणींना वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले. दोघींनी नकार दिल्यानंतर त्यांना डांबून ठेवले. त्यांना धमकावून शिवीगाळ केली. मारहाण करुन छळ केला, तसेच त्यांना उपाशी ठेवले. दोघींना वेश्याव्यवसायास प्रवृत्त करुन त्यांच्याकडून आरोपी पैसे घेत होते.
गेल्या आठवड्यात आंबेगाव पठार भागात एका तरुणीला त्यांनी आणले. तिलाही वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले. या तरुणीने संधी साधून मोबाइल क्रमांकावरुन पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात संपर्क साधला. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांनी तपास पथकाला तरुणीचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसंनी छापा टाकून आरोपी चिद्रवारच्या ताब्यातून फिर्यादी तरुणीसह दोघींची सुटका केली. पोलीस निरीक्षक खिलारे तपास करत आहेत.