लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: कोरेगाव पार्क भागातील एका उपहारगृहात जेवण करुन निघालेल्या व्यावसायिकाच्या मोटारीत दहा लाखांची खंडणी मागण्यात आल्याची चिठ्ठी चिटकवण्यात आली होती. खंडणी न दिल्यास कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणात गुन्हे शाखेने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाला सोलापूर जिल्हयातील माळशिरस परिसरातून अटक केली. कर्जबाजारी झाल्याने त्याने व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

श्रीनाथ शेडगे (रा. वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तक्रारदार व्यावसायिक मूळचे हॉटेल व्यावसायिक आहेत. त्यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. ३१ जुलै रोजी व्यावसायिक आणि त्याचा मित्र कोरेगाव पार्क भागातील एका उपाहारगृहात रात्री जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण करुन व्यावसायिक आणि त्याचा मित्र उपाहारगृहातून बाहेर पडले. तेव्हा मोटारीच्या काचेवर पांढऱ्या रंगाचे पाकीट चिटकवण्यात आल्याचे व्यावसायिकाच्या लक्षात आले. पाकीट उघडल्यानंतर त्यात चिठ्ठी सापडली. व्यवासायिकाने चिठ्ठी उघडून पाहिली. तेव्हा हिंदी भाषेत चिठ्ठी लिहिण्यात आल्याचे व्यावसायिकाच्या लक्षात आले. मला दहा लाख रुपयांची गरज आहेत. पैसे न दिल्यास कुटुंबीयांना जीवे मारु, अशी धमकी देण्यात आली होती.

आणखी वाचा-सावधान! राज्यात डोळ्यांच्या साथीचा उद्रेक; रुग्णसंख्या तब्बल १ लाख ८७ हजारांवर

चिठ्ठीत लिहिलेल्या मोबाइल क्रमांकावर व्यावसायिकाला संपर्क साधण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार व्यावसायिकाने मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर व्यावसायिक जेजुरीला गेले होते. त्यावेळी व्यावसायिकाच्या मोबाइल क्रमांकावर आरोपीने संपर्क साधला. व्यावसायिकाकडे दहा लाखांची खंडणी मागण्यात आली. व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर गुन्हे शाखेकडून याप्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार शेडगेला वेळापूर परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, उपनिरीक्षक नितीन कांबळे, गजानन सोनुने, अमोल सरडे, पुष्पेंद्र चव्हाण आदींनी ही कारवाई केली.

आणखी वाचा- पुणे: गणेशखिंड रस्त्यावर दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात; राहुल चित्रपटगृहासमोर रस्ता निसरडा

मालिका पाहून खंडणीचा कट

आरोपी श्रीनाथ शेडगेचे आई-वडील शेती करतात. गेल्या आठ महिन्यांपासून तो पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. शेअर बाजारात त्याने काही पैसे गुंतवले होते. शेअर बाजारात नुकसान झाल्याने त्यांने एका घरपोहोच खाद्यपदार्थ उपलब्ध करुन देणाऱ्या कंपनीत काम केले होते. दूरचित्रवाहिनीवरील मालिका पाहून त्याने व्यावसायिकाकडे खंडणी मागण्याचा कट रचला. मजूर अड्ड्यावरील एका मजुराकडून कागदपत्रे घेऊन त्याने सीमकार्ड घेतले. या सीमकार्डचा वापर करुन त्याने व्यावासायिकाकडे खंडणी मागितली.