पिंपरी : बेकायदेशीर पिस्तुलाची पोलिसांना माहिती दिल्याच्या रागातून एकास दगड व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना मावळ तालुक्यातील कातवी येथे घडली.

अशोक रघुनाथ चव्हाण ( वय ४९, रा. कातवी, मावळ) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे बेकायदेशीर पिस्तुल असल्याची माहिती अशोक यांनी पोलिसांना दिली होती. त्याचा आरोपीला राग आला. या रागातून लाकडी दांडक्याने व दगडाने अशोक यांच्या डोक्यात व हातावर मारहाण केली. यामध्ये अशोक हे जखमी झाले. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.