पुणे : मेफेड्रोन विक्री करणाऱ्या नायजेरियन नागरिकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून १२ लाख ४४ हजार रुपयांचे ६२ ग्रॅम मेफेड्रोन, दोन मोबाइल संच, दुचाकी असा १२ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
व्हेलेंटाइन उर्फ जेम्स अमुचे ईझेजा (वय ३५, सध्या रा. येवलेवाडी, कोंढवा, मूळ रा. नायजेरिया) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. अमली पदार्थविरोधी पथकातील पोलीस कर्मचारी कोंढव्यातील येवलेवाडी भागात गस्त घालत होते. त्या वेळी व्हेलेंटाइन मेफेड्रोन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने कोंढवा भागात सापळा लावला.
व्हेलेंटाइन दुचाकीवरून तेथे आला. तो कोणाची तरी वाट पाहत थांबला. पोलिसांनी त्याच्या हालचाली टिपल्या. नंतर त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेण्यात आली, तेव्हा त्याच्याकडे मेफेड्रोन सापडले. मेफेड्रोन, दुचाकी, तसेच दोन मोबाइल संच जप्त करण्यात आले.