पुणे : मेट्रो विस्तारीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात शिवाजीनगर-कोंढवा मार्गिका प्रकल्पाला गती देण्यासाठी सल्लागार नियुक्ती प्रक्रिया केली जाणार आहे. पुढील तीन महिन्यांत या मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून मंजुरीसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनचे (महामेट्रो) व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
कोंढवा आणि येवलेवाडी भागातील वाहतूक समस्येचा मुद्दा नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार योगेश टिळेकर यांनी उपस्थित केला होता. तसेच, या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. मेट्रो मार्गिका क्रमांक तीन ही हिंजवडी ते शिवाजीनगर आणि तेथून पुढे कोंढव्यापर्यंत जाणार आहे. त्यामुळे कोंढवा, एनआयबीएम, येवलेवाडी परिसरातील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे. या परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर ते कोंढवा हा २० किलोमीटर मार्गिकेचा प्रकल्प महामेट्रोकडून प्रस्तावित करण्यात आला आहे.
‘हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गही लवकरच सुरू होणार आहे. तत्पूर्वी महामेट्रोने मार्गिका विस्तारासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. महामेट्रोच्या प्रस्तावित खडकवासला, हडपसर, स्वारगेट आणि खराडी यांना जोडणाऱ्या मेट्रो मार्गांना राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. याशिवाय, प्रस्तावित पुरंदर विमानतळाच्या दृष्टीने हडपसर ते सासवड या मेट्रो लाइन-४ च्या विस्ताराचाही प्रस्ताव आहे. या प्रकल्पांमुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होईल, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले.
शिवाजीनगर- कोंढवा प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पुढील तीन महिन्यांत ‘डीपीआर’ तयार करून अंतिम मंजुरीसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. – श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो