पुणे : राज्यात इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा लागू करण्याबाबतच्या चर्चेला शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी रविवारी पूर्णविराम दिला. ‘इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा लागू करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. त्याबाबत कोणाच्याही मनात काहीही शंका असायला नको. आतापर्यंत जी कार्यपद्धती होती, त्यानुसारच शैक्षणिक कामकाज होईल,’ अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पुण्यात केली. मात्र, तिसऱ्या भाषेच्या स्थगितीबाबतचा शासन निर्णय कधी प्रसिद्ध होईल, याबाबत त्यांनी काही भाष्य केले नाही.
पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित ‘पुणे बालपुस्तक जत्रे’ला भेट दिल्यानंतर भुसे यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यात पहिलीपासून तिसरी भाषा लागू करण्याचा निर्णय स्थगित केल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘या पूर्वी हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला होता. त्यातून काही मुद्दे पुढे आले होते. मात्र, विद्यार्थी, त्यांचे पालक यांना कोणत्या विषयासाठी शिक्षण अपेक्षित आहे, कोणत्या वर्गापासून तिसरी भाषा असावी या बाबतच्या सूचना घेतल्या जातील. पुढील काळात त्याबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र, सध्या आतापर्यंतचीच कार्यपद्धती कायम राहील.
राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०ची शालेय स्तरावरील अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार केला. त्यानुसार प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयात इयत्ता पहिलीपासून हिंदी ही तिसरी भाषा म्हणून अनिवार्यपणे शिकविण्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, पहिलीपासून हिंदी शिकविण्याच्या निर्णयाला राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातून तीव्र विरोध झाला. त्यानंतर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी ‘अनिवार्य’ या शब्दाला स्थगिती देऊन अन्य भारतीय भाषांचेही पर्याय उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले होते. मात्र, त्याबाबतचा अधिकृत शासन निर्णय अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. तसेच, पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याबाबत बालभारतीच्या परिपत्रकातील ‘इयत्ता पहिलासाठी ‘खेल खेल में सिखे हिंदी’ (मराठी व इंग्रजी माध्यमांसाठी) या पाठ्यपुस्तकाबाबत सर्व संबंधितांना अलहिदा कळवले जाईल,’ अशा संदिग्ध वाक्यरचनेमुळे पहिलीपासून हिंदी शिकवले जाण्याबाबत संभ्रम वाढल्याचे शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे होते.