पुणे : कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळ याचा भाऊ सचिन याला शस्त्र परवाना देण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शिफारस केल्याची माहिती उघडकीस आली आहे.

पुणे पोलिसांनी नीलेश घायवळ आणि त्याचा भाऊ सचिन याची गुन्हेगारी पार्श्वभूमी विचारात घेतली होती. सचिन याला शस्त्र परवाना देण्यासाठी नकार दिला होता. कदम यांच्या शिफारशीनंतर गृह खात्याकडून २० जून २०२५ रोजी सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्याचा आदेश देण्यात आला.

सचिन बन्सीलाल घायवळ याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. काही प्रकरणात त्याची न्यायालायने निर्दोष मुक्तता केली होती.

सचिनने पुणे पोलिसांकडे शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता. त्याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल असल्याने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी २० जानेवारी रोजी त्याचा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर सचिनने गृह खात्याकडे अपील दाखल केले. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पोलिसांचा निर्णय रद्द केला. तसेच, सचिनने दाखल केलेेले अपील मंजूर करण्याचे आदेश दिले.

शस्त्र परवान्यासाठी दिलेले कारण

‘व्यावसायिक कामानिमित्त मी मोठी रोकड बाळगतो. माझ्या जिवाला धोका आहे. त्यामुळे शस्त्र बाळगणे गरजेचे आहे’, असे कारण सचिन घायवळने शस्त्र परवाना मिळवण्यासाठी दिले होते.

सचिन घायवळने शस्त्र परवाना मिळविण्यासाठी दाखल केलेला अर्ज फेटाळण्यात आला होता. गृहराज्यमंत्र्यांनी घायवळला शस्त्र परवाना देण्याचा आदेश दिला असला, तरी अद्याप पुणे पोलिसांनी याबाबतची कार्यवाही केली नाही. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे