पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी अक्षम्य चुका केल्या आहेत. मुंढवा पोलीस ठाण्याचे तीन पोलीस कर्मचारी हप्तेबाज असून, मुंढवा पोलीस ठाणे ते तीन कर्मचारी चालवतात. ते तीन पोलीस कर्मचारी पब, हॉटेलचालकांकडून पैसे घेतात. त्यांची तातडीने चौकशी करून त्यांना निलंबित करा, अन्यथा ४८ तासांत हप्तेबाज कर्मचाऱ्यांची चित्रफीत प्रसारित करण्यात येईल, असा इशारा आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिला आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार बांधकाम व्यावसयिकांना धार्जिणे असून, त्यांची तातडीने बदली करण्याची मागणीही आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली. कल्याणीनगर अपघात प्रकरणाची त्रयस्त यंत्रणेमार्फत किंवा निवृत्त न्यायाधिशांमार्फत चौकशी करावी, अशी सूचना त्यांनी केली आहे.

हेही वाचा >>> ‘दोन एफआयआर का, गाडीत किती लोक होते, आरोपीला पिझ्झा दिला का?’; पोर्श कार अपघात प्रकरणात पोलीस आयुक्तांची महत्वाची माहिती

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी येरवडा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी बांधकाम व्यावसायिकाकडून कोट्यवधी रुपये घेतले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अपघात प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांनी पाठीशी घातले. त्यामुळे त्यांची तातडीने बदली करावी. बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या व्यावसायिक कामातही अनियमितता आहे. बांधकाम नियमावलीचे उल्लंघन करून त्यांनी कामे केली आहेत. अगरवाल यांचे मुंबईतील गुंड टोळ्यांशी संबंध आहेत. याबाबतचा तपास थांबलेला आहे. याप्रकरणाची गृह खात्याने कसून चौकशी करावी, असे धंगेकर यांनी सांगितले.

हेही वाचा >>> “बिल्डर कुटुंबाने पैशांच्या जोरावर गुन्हा पचवला होता, पण…”, आमदार रवींद्र धंगेकरांचा आरोप

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई करण्यास चालढकल करण्यात आली. कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोलीस चालढकल करून आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पबचा त्रास स्थानिक रहिवाशांना होत आहे. तरुण पिढीला वाचवण्यासाठी पब संस्कृती मुळापासून उखडून टाकण्याचे धाडसी पाऊल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उचलावे. पब संस्कृतीमुळेच कल्याणीनगर भागात अपघात घडला. प्रकरणातील दोषी असलेल्या अल्पवयीन आरोपी मुलाला वाचवण्यासाठी यंत्रणेने काम केले आहे. पोलिसांनी गुन्ह्यात जी कलमे लावणे आवश्यक होती, ती लावली नाहीत. तपास अधिकाऱ्यांना निलंबित करायला हवे, असे त्यांनी सांगितले.