लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : स्वयंपाक करण्यावरुन झालेल्या वादातून सुनेला शिवीगाळ, तसेच अंगावर रॉकेल ओतून पेटवून देणाऱ्या सासू आणि नणंदेला अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रभाकर जाधव यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मूत्यूपूर्व जबाब, तसेच साक्ष, पुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने सासू आणि नणंदेला दोषी ठरविले.

ममता विजय चव्हाण (वय ४८, रा. श्रमिकनगर, मंगळवार पेठ) आणि रिटा उर्फ गौरी संतोष वाल्मिके (वय ३४, रा. जयजवाननगर) अशी शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत. स्वयंपाक करण्यावरुन झालेल्या वादातून सासू ममता आणि नणंद रिटा यांनी दीपाली अमित चव्हाण (वय २८) हिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याची घटना १ नोव्हेंबर २०२३ रोजी घडली होती. गंभीर भाजलेल्या दीपालीला पती अमितने ससून रुग्णालयात दाखल केले होते. त्या वेळी ससून रुग्णालयात फरासखाना पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक परशुराम शिंदे यांनी तिचा वैद्यकीय तज्ज्ञांच्या उपस्थितीत जबाब नोंदवून घेतला होता. उपचारादरम्यान दीपालीचा ३ नोव्हेंबर रोजी ससून रुग्णालयात मृत्यू झाला होता.

त्यानंतर पोलिसांनी सासू ममता आणि नणंद रिटा यांना अटक केली होती. दीपालीचा पेटवून देऊन खून केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी दोघींविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली होती. या खटल्यात सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून आठ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. साक्ष, तसेच मृत्यपूर्व जबाब ग्राह्य धरुन आरोपी सासू आणि नणंदेला जन्मठेप आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mother in law and sister in law sentenced to life imprisonment for setting women on fire pune print news rbk 25 mrj