पुणे : स्वदेशीकरण, संशोधन विकास, नवोन्मेषाला चालना देण्यासाठी भारतीय लष्कर आणि उद्योग क्षेत्र एकत्र आले आहेत. भारतीय लष्कराचे बेस वर्कशॉप ग्रुप मुख्यालय, भारतीय लष्कर, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर (एमसीसीआयए) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असून, या अंतर्गत इनक्युबेशन समूह स्थापन करून त्याद्वारे लष्कर, तज्ज्ञ, उद्योग, शिक्षण संस्था मिळून नवीन प्रकल्प राबवणे, पुणे आणि परिसराला भू-प्रणाली तंत्रज्ञान विकास व उत्पादन, संशोधन आणि नवोन्मेषाचे केंद्र, भविष्यातील निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
संरक्षण विभागाने या बाबतची माहिती दिली. एमसीसीआयए ही उद्योग आणि वाणिज्य क्षेत्रातील अग्रगण्य संस्था आहे. व्यापार, शेती क्षेत्रासह पुणे आणि परिसरात गुंतवणूक, निर्यातीच्या दृष्टीने एमसीसीआयएद्वारे कार्य केले जाते. या संस्थेशी केलेल्या सामंजस्य कराराद्वारे लष्कराचे बेस वर्कशॉप ग्रुप मुख्यालयाच्या संशोधन आणि संयुक्त विकासाच्या गरजांसाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात येतील. एमसीसीआयएच्या माध्यमातून तयार उत्पादने थेट स्वीकारली जातील किंवा पुढील स्तरावर त्यांचा वापर करण्यात येईल. तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन, तांत्रिक सल्ला लष्कराच्या गरजांशी सुसंगत ठरणार आहे. स्थानिक उत्पादकांच्या मदतीने लष्करी वाहनांचे स्वदेशीकरण, दुरुस्ती, नूतनीकरणाला चालना देण्यात येणार आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, मानवरहित हवाई यंत्रणा अशा उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा भारतीय लष्कराच्या भू-प्रणालींमध्ये समावेश करण्यावर भर दिला जाणार आहे. त्या दृष्टीने आर्मी बेस वर्कशॉप येथे इन्क्युबेशन क्लस्टरची स्थापना केली जाणार आहे. संशोधन, प्रकल्पांसह उद्योगासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासही प्राधान्य देण्यात येणार असून, नवउद्यमी, तंत्रज्ञान प्रदर्शने, आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी सामायिक मंच उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.