पुणे : ‘पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचे पाणी रोखले. त्या देशाबरोबरचा व्यापार थांबवला. पण, दुसरीकडे पाकिस्तान विरोधात क्रिकेट सामना खेळला. पाकिस्तान विरोधात खेळण्यास नकार दिला असता, तर पाकिस्तानचे मोठे आर्थिक नुकसान झाले असते. भारताच्या सामन्यातील विजयानंतर पंतप्रधान या विजयाला ‘ऑपरेशन सिंदूर-३’ असे संबोधतात. मात्र, पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यांमधील हुतात्म्यांची तुलना क्रिकेट सामन्याबरोबर कशी होऊ शकते,’ असा प्रश्न ‘एमआयएम’चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी उपस्थित केला.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ओवेसी यांच्या वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील आणि सरचिटणीस मंगेश फल्ले या वेळी उपस्थित होते.

‘पुलवामा आणि पहलगाममध्ये हल्ला झाला. एवढी सुरक्षाव्यवस्था असताना देशातील निष्पाप नागरिकांवर हल्ला करण्यासाठी दहशतवादी आत आलेच कसे, हा प्रश्न कोणी विचारत नाही, आणि उत्तरही कोणी देत नाही. पहलगाम हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये आपल्याकडे पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवण्याची संधी होती. गुजरात ते काश्मीर सर्व सीमांवर पाकिस्तानचे ड्रोन होते. पाकिस्तानला अद्दल घडवावी, अशी संपूर्ण देशाची भावना होती. मात्र, आपण अचानक शस्त्रसंधी का केली,’ अशी विचारणा करून ओवेसी म्हणाले, ‘या प्रकारची संधी पुन:पुन्हा येत नाही. आपण ती घालवली. दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात क्रिकेट सामना खेळण्याची आवश्यता नव्हती.’

ते म्हणाले, ‘देशातील ६५ टक्के लोकसंख्या ४० वर्षांखालील आहे. मात्र, सरकारच्या कारभारामुळे एक पिढी पूर्णपणे निराश झाली आहे. दुसरी पिढी बरबाद होण्याच्या मार्गावर आहे. देशातील २५ टक्के युवकांना शिक्षण नाही, नोकरी नाही. प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पेपरफुटीमुळे अन्याय होत आहे. पूल पडणे, वारंवार येणारे पूर, वाढता भ्रष्टाचार, निष्क्रिय प्रशासन आणि संपत्तीचे असंतुलन यामुळे ही पिढी हताश झाली आहे.’

‘एक जादूगार दिल्लीत बसून जादूचे प्रयोग करत आहे. त्यामुळे लोकशाहीचे नुकसान होत आहे. देशातील लोकसंख्या जसजशी वृद्धत्वाकडे जाईल, त्या वेळी प्रश्न निर्माण होतील. सरकारच्या या धोरणामुळे ‘मिलेनियल्स’ आणि ‘जेन झी’ या दोन पिढ्या बरबाद होणार आहेत. या पिढीला त्यांच्या चुका लक्षात येतील, तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. त्यामुळे या जादूगाराच्या मोहजालातून बाहेर पडावे लागेल,’ असेही ओवेसी म्हणाले.

‘सध्या विद्यार्थीदशेत असलेल्या युवकांना गोरक्षक बनवले जात आहे. एका धर्माविरोधात भडकावले जात आहे. मात्र, आपले खरे शत्रू हे मुस्लिम नसून सध्याचे सत्ताधारी आहेत, हे त्यांच्या लक्षात येत नाही,’ असेही ओवेसी यांनी नमूद केले.

‘पाकव्याप्त काश्मीर भारताचा भूभाग’ ‘

पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे. संसदेनेही तसा ठराव केला आहे. जे आपले आहे, ते आपण घेतलेच पाहिजे. ते स्वत:हून आपल्याकडे येईल, याची वाट पाहता कामा नये,’ असेही असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘राज्याराज्यात भाजपची सत्ता आहे, तेथे मुस्लिम समाजाला मागे ढकलण्याचे काम केले जात आहे. त्यांना धमकावणे, त्यांच्या घरावर बुलडोझर चालविणे असे प्रकार होत आहेत. डोक्यात हवा गेल्याने सत्ताधाऱ्यांच्या ते लक्षात येत नाही. भारत सक्षम होण्यासाठी, विश्वगुरू होण्यासाठी सर्व समाज एका पातळीवर यायला हवा. मुस्लिम समाजाला एका बाजूला सारून भारत विश्वगुरू होणार नाही.’