पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी जाहीर करण्यात आली आहे. २४ मे ते ६ जून या कालावधीत नवी मुंबई येथे शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे.

एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. एमपीएससीने या पूर्वी शारीरिक चाचणीचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार १५ एप्रिल ते २ मे या कालावधीत शारीरिक चाचणी घेतली जाणार होती. मात्र लोकसभा निवडणुकीमुळे शारीरिक चाचणी पुढे ढकलण्यात आली होती. मात्र शारीरिक चाचणीसाठी मैदान, अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध करून देण्यास पोलीस महासंचालक कार्यालयाने सहमती दर्शवली आहे.

हेही वाचा…मतदान केंद्र शोधा ‘पीएस जिओपोर्टल’वर

त्यामुळे शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला. शारीरिक चाचणी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे घेतली जाणार आहे. त्यामुळे चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी शारीरिक चाचणीच्या सरावाच्या दृष्टीने याची नोंद घेऊन सराव करावा. शारीरिक चाचणीचा सविस्तर सुधारित कार्यक्रम https://mpsc.gov.in/ या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.