पुणे : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (एमएसबीटीई) वास्तूशास्त्र आणि अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम राबवणाऱ्या संस्थांमध्ये मल्टिपल एंट्री-एक्झिट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रथम वर्ष उत्तीर्ण केलेल्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी पदविका अभ्यासक्रम सोडण्याचा पर्याय देण्यात आला असून, त्याबाबतच्या नोंदणीसाठी येत्या २० जूनपर्यंत ऑनलाइन दुवा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती एमएसबीटीईचे सचिव डॉ. महेंद्र चितलांगे यांनी दिली.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून के स्कीम अंतर्गत प्रथम वर्षाचा सुधारित केलेला पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम राबवण्यास सुरुवात करण्यात आली. सद्य:स्थितीत द्वितीय वर्षांचा अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये मल्टिपल एंट्री-एक्झिटचा पर्याय इच्छुक विद्यार्थ्यांना देण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे मंडळाशी संलग्न वास्तुशास्त्र आणि अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम राबवणाऱ्या सर्व पदविका संस्थांतील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पदविका अभ्यासक्रम सोडण्याचा पर्याय लागू राहील. त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष उत्तीर्ण करणे आणि चार आठवड्यांचे कार्यप्रशिक्षण (इंटर्नशीप) पूर्ण करणे बंधनकारक राहील. तसेच अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम सोडणाऱ्या विद्यार्थ्यांना एमएसबीटीईकडून व्यावसायिक प्रमाणपत्र (सर्टिफीकेट ऑफ व्होकेशन) दिले जाईल.

हेही वाचा…पुणे : नगर रस्त्यावरील खराडीतील गोदामास मोठी आग

अभ्यासक्रम सोडण्यासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी एमएसबीटीईच्या संकेतस्थळावर ‘लर्निंग असेसमेंट स्किम फॉर वन इयर एक्झिट कोर्स’चा ऑनलाइन दुवा २० जूनपर्यंत उपलब्ध करून देण्यात येईल. या बाबत प्राचार्य, संस्थाप्रमुखांनी सर्व विभागप्रमुख तसेच अधिव्याख्याता यांना माहिती द्यावी. तसेच विद्यार्थ्यांच्या औद्योगिक प्रशिक्षणाबाबत औद्योगिक क्षेत्र ठरवण्याची जबाबदारी संबंधित प्राचार्याची असेल, असे स्पष्ट करण्यात आले. .